मुंबई वृत्तसंस्था । अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या शिवसेनेच्या मागण्यांवरून भाजप-शिवसेना युतीत निर्माण झालेला वाद चिघळले आहे. दरम्यान ‘लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘सत्तासाठी मेरिटनुसार विचार केला जाईल. त्यांच्या योग्य मागण्या मान्य केल्या जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली.
राज्यात भाजपच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल. येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत राज्यात नवीन सरकार स्थापन होईल. यासाठी आत्तापर्यंत १० अपक्ष आमदारांनी भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. हा आकडा १५ पर्यंत जाणार आहे. भाजपचे जे बंडखोर निवडून आले आहेत त्यांचे आम्ही स्वागतच केले आहे. त्यांना तिकीट नाकारताना त्यांची क्षमता ओळखण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो.
शिवसेना आक्रमक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. ‘मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील, तर चर्चेसाठी उरलंच काय? बैठकीत कशावर चर्चा करायची?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपची मंत्रिमंडळ स्थापण्याबाबतची होणारी बैठकच रद्द केली. मंगळवारी सायंकाळी ही बैठक होणार होती.