राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर

datta padsalgikar

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलीगर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या अतिशय महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली असून ते अजित डोवाल यांचे सहकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यावर आता राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या अतिशय महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या या नवीन नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यासोबत त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारीदेखील असेल. ते १९८२च्या आपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या पोलीस सेवेत विविध पदांवर त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे. कारकिर्दीच्या प्रारंभी उस्मानाबाद आणि सातारा येथे पोलीस अधिक्षक म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी बजावली होती. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय पातळीवरील विविध जबाबदार्‍या अतिशय समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी आयबी या गुप्तचर यंत्रणेत सुमारे दहा वर्षे काम केले असून या दरम्यान अनेक किचकट कारवायांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. २०१६ साली त्यांची मुंबईचे पोलीस आयुक्त तर नंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते केंद्रीय राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या अत्यंत महत्वाच्या पदावर रूजू होणार आहेत.

विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गत सुमारे पाच वर्षांमधील कामगिरीने देशातील सर्वसामान्यांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली आहे. याच डोवाल यांच्यासोबत दत्ता पडसलगीकर हे त्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम करणार आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ख्यात असणार्‍या पडसलगीकर यांचा या पदाच्या माध्यमातून यथोचित गौरव करण्यात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content