Home राजकीय महायुतीत विधान परिषद जागावाटपावरून रस्सीखेच; १७ पैकी १४ मतदारसंघांत भाजप मजबूत

महायुतीत विधान परिषद जागावाटपावरून रस्सीखेच; १७ पैकी १४ मतदारसंघांत भाजप मजबूत


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच महायुतीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा राज्यभर स्पष्ट दबदबा दिसून येत असून 17 पैकी तब्बल 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे बहुमताची स्थिती असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनीही आपापल्या मजबूत मतदारसंघांवर दावा कायम ठेवला असल्याने महायुतीत जागावाटपाचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे. येथे शिवसेनेकडे 275 मते असून भाजपकडे 241 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 149 मते आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. मात्र, हीच जागा राष्ट्रवादीकडून नेते अनिकेत तटकरे यांच्यासाठी मागितली जात असल्याची चर्चा असून त्यामुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत दिसून येत आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे 375 मते असून भाजपकडे 335 आणि शिवसेनेकडे 82 मते आहेत. तर परभणी-हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीकडे 123, भाजपकडे 111 आणि शिवसेनेकडे 74 मते आहेत. मात्र पुण्यात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतसंख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याने भाजपने या जागेवरही जोरदार दावा ठोकला आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेवरून महायुतीत सर्वाधिक रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.

राजकीय वर्तुळात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला परभणी-हिंगोलीची जागा देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून महायुतीतील तीनही पक्ष आपापला राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपकडे सर्वाधिक जागा जिंकण्याची क्षमता असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपापली ताकद लक्षात घेऊन अधिक जागांची मागणी लावून धरली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला 15 जागा, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र महायुतीतील राजकीय संतुलन लक्षात घेऊन भाजपकडून शिवसेनेला अधिक जागा देण्याचाही प्रस्ताव चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेने सुरुवातीला 7 जागांची मागणी केली होती. त्यानंतर भाजपकडून 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आणि नंतर हा आकडा 6 पर्यंत नेण्याबाबत चर्चा पुढे सरकली. जळगाव, नाशिक आणि रायगड या जागांवर सध्या सर्वाधिक राजकीय हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

प्रमुख मतदारसंघांतील आकडेवारी पाहिली तर ठाण्यात भाजपकडे 431, शिवसेनेकडे 309 आणि राष्ट्रवादीकडे 18 मते आहेत. नागपुरात भाजपची सर्वाधिक ताकद दिसून येत असून पक्षाकडे तब्बल 501 मते आहेत. सोलापुरात भाजपकडे 304, सांगली-सातारात 371, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 379, तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात 254 मते आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 186, शिवसेनेकडे 161 आणि राष्ट्रवादीकडे 107 मते आहेत. याशिवाय भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्येही भाजपची पकड मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांत अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून इच्छुक उमेदवारांकडूनही जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपचा स्पष्ट वरचष्मा असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आपल्या वाट्याच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound