Home क्रीडा एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स होऊ शकतो बाहेर?

एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स होऊ शकतो बाहेर?


चंदीगड -वृत्तसेवा । आयपीएल 2026 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून आज मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ‘करो या मरो’चा एलिमिनेटर सामना रंगणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विजयी संघाला क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळणार असून अंतिम फेरीचे स्वप्न कायम राहणार आहे, तर पराभूत संघाचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास इथेच संपणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची चिंता अधिक वाढली आहे.

मुल्लानपूरमध्ये आज वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज असल्याने सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे—जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पुढे काय? आयपीएलच्या प्लेऑफ नियमांनुसार एलिमिनेटर सामन्यासाठी कोणताही ‘रिझर्व्ह डे’ ठेवलेला नाही. म्हणजेच खराब हवामानामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही किंवा सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर त्याचा थेट परिणाम संघांच्या भवितव्यावर होणार आहे.

आयपीएलच्या अधिकृत नियमानुसार लीग टप्प्यात गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला अशा परिस्थितीत मोठा फायदा मिळतो. यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर राहिला. त्यामुळे जर पावसामुळे सामना रद्द झाला आणि एकही चेंडू खेळला गेला नाही, तर हैदराबादला थेट क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळेल. राजस्थान रॉयल्सला मात्र मैदानात उतरण्याची संधीही न मिळता स्पर्धेला निरोप द्यावा लागू शकतो. त्यामुळे राजस्थानसाठी आज हवामानही प्रतिस्पर्धी संघाइतकंच मोठं आव्हान ठरणार आहे.

एलिमिनेटर सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच-पाच षटके खेळणे आवश्यक आहे. जर इतका खेळ झाला, तर डकवर्थ-लुईस नियमानुसार विजेता निश्चित होऊ शकतो. पण पाच षटकांपूर्वीच पाऊस आल्याने सामना थांबला आणि पुढे खेळ शक्य झाला नाही, तर सामना रद्द मानला जाईल. अशावेळी पुन्हा एकदा गुणतालिकेतील स्थान निर्णायक ठरेल आणि त्याचा थेट फायदा सनरायझर्स हैदराबादला मिळेल. त्यामुळे राजस्थानसाठी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक षटक महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन्ही संघांमधील यापूर्वीची आकडेवारी पाहिली तर हैदराबादचे पारडे जड दिसते. आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात 23 सामने झाले असून त्यात हैदराबादने 14 विजय मिळवले आहेत, तर राजस्थानला 9 वेळाच यश मिळाले आहे. विशेष म्हणजे चालू हंगामातील दोन्ही सामन्यांतही हैदराबादने राजस्थानवर मात केली आहे. त्यामुळे आत्मविश्वासाच्या बाबतीतही हैदराबाद काहीसे पुढे असल्याचे चित्र आहे. मात्र प्लेऑफमध्ये दबाव वेगळाच असतो आणि एका सामन्यात संपूर्ण चित्र बदलू शकते.

एकंदरीत आजचा एलिमिनेटर केवळ दोन संघांतील सामना नाही, तर त्यात पावसाचा अंदाज, दबाव, आकडेवारी आणि प्लेऑफचे समीकरण अशा अनेक गोष्टींचा थरार एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सला मैदानात उतरून स्वतःचे नशीब लिहायचे आहे, तर हैदराबादला आपली लय कायम ठेवायची आहे. मात्र शेवटी विजय कुणाचा होणार, की पाऊसच सामन्याचा निकाल ठरवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.


Protected Content

Play sound