दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) भुसावळ येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात राखेच्या वाटपात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप स्थानिक उद्योजकांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक लघुउद्योग अडचणीत आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
महाजेनकोने प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि पूरक व्यवसायासाठी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन पूर्णपणे पाळले गेले नसल्याचा आरोप आहे. प्रकल्पग्रस्तांना राख आधारित वीट उत्पादन व्यवसायासाठी 20% राखीव कोट्यातून राख देण्याचे ठरले होते. परंतु, राख माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने या वाटपात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप आहे.
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेवर अवलंबून असलेल्या वीट व्यावसायिकांशी चर्चा केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाजेनको प्रशासनाने प्रत्येक व्यावसायिकाला दर महिन्याचा राखेचा वाटा ठरवून दिलेला असताना, तो त्यांना वेळेवर मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या संगनमताने राख माफिया ठरलेला वाटा इतरत्र वळवतात, असा आरोप आहे. त्यामुळे अनेक सूक्ष्म लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून, उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
काही अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावावर स्वतः भागीदारीत राखेचा व्यवसाय सुरू केला आहे. मध्यम उद्योगांनाही कागदोपत्री लघु उद्योगात दाखवून 20% राखीव कोट्यातून राख मिळवून दिली जात आहे. यामुळे महाजेनकोचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, बंद कंपन्यांचे अस्तित्व आणि उत्पादन पडताळणीचे कामही संबंधित अधिकारीच करत असल्याचा आरोप आहे. गरजवंत उद्योजकांना राख मिळत नसताना, काही जणांना गरजेपेक्षा जास्त राख दिली जात आहे. या प्रकरणी स्थानिक उद्योजकांनी चौकशीची मागणी केली आहे. लवकरच संघटना स्थापन करून महाजेनकोचे मुख्य महाव्यवस्थापक आणि ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.