अखेर कासोद्यात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ : Live Trends News Impact

kasoda mohim 1

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । येथील अस्वच्छतेबाबतचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून व्हायरल होताच ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिम सुरू केली आहे.

याबाबत वृत्त असे की, कासोदा येथील अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्मित झाले आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर आमदारांनी दत्तक घेतलेल्या कासोदा गावात घाणीचे साम्राज्य या शीर्षकाखाली एक वृत्त प्रकाशित झाले होते. यात गाव दत्तक घेणारे आमदार तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन दखल घेणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, हे वृत्त कासोदा गावासह तालुका आणि जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याची ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.

आज सकाळपासून कासोदा गावात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी गटारी साफ करण्यासाठी परिसरातील घाण हटविण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या पवित्र्याचे ग्रामस्थांनी स्वागत करून नेहमी याच प्रकारे स्वच्छता मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर अनेक ग्रामस्थांनी गटारीवर पायर्‍या बांधल्या असून यामुळे घाण अडकत असल्यामुळे पाणी साचून राहत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतीच्या मोहीमेला बळ देण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा सरपंच पुत्र भैया राक्षे, प्रभारी सरपंचांचे पुत्र बापू सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मुक्तार अली यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content