कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा गावाने सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळवला असला तरी, लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावाचा विकास खुंटला आहे.हे गाव आमदार डॉ. सतिश पाटील यांनी दत्तक घेतले असुन, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्वला पाटील ह्या देखील कासोदा गावाच्याच आहेत. असे असले तरी गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कासोद्याची लोकसंख्या सुमारे ३० हजार असून लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. येथील ग्रामपंचायतीचे स्वच्छता व सुव्यवस्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गावातील बहुतांश गटारींमध्ये प्लास्टिक पिशव्या, कागद, कुरकुरेची रिकामी पाकीटे, बिसलरीच्या बाटल्या, गाळ विटा, माती, आदी वस्तुंनी भरलेल्या असल्यामुळे त्या ब्लॉक झाल्या आहेत. गटारींमधील पाणी थेट गल्लीमध्ये व रस्त्यांवर वाहते आहे. या पाण्यातच लहान मुलांना व म्हाताऱ्यांना ये-जा करावे लागत असुन याचा सगळ्यांना खूप त्रास होत आहे. या जाचाला ग्रामस्थ खूप त्रासले आहेत. कधी गटार साफ केल्या जात नाहीत तर साफ केलेल्या गटारींमध्ये काढलेली घाण परत गटारीत जाते. ग्रामपंचायत कर्मचारी घाण उचलण्याचे काम करीत नाहीत. गावांमधील काही गटारींवरील ढापे तुटल्याने तेथे विटा व दगड ठेऊन काम धकवले जात असल्याचे दिसत आहे. या गोष्टीकडे गाव दत्तक घेणारे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ? असा सवाल गावातील लोक विचारीत आहेत.