जळगाव । अनेक तर्क-वितर्कांना विराम देत अखेर काँग्रेसतर्फे रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे तब्बल एका तपानंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा लेवा विरूध्द लेवा अशी राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.
पुनर्रचनेत बदलले समीकरण
आधीच्या जळगाव आणि सध्याच्या रावेर मतदारसंघातून सातत्याने लेवा पाटीदार समाजाचे खासदार निवडून येत आहेत. यामुळे विजयी व पराभूत हे दोन्ही उमेदवार बहुतांश वेळेच याच समाजाचे असल्याची परंपरा आहे. २००९ साली जळगावची पुनर्रचना होऊन रावेर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामुळे मतदारसंघात मराठा समाजाची संख्या जास्त झाली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. रवींद्रभैया पाटील यांना उमेदवारी देऊन सामाजिक समीकरण साधत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत भाजपचे हरीभाऊ जावळे यांनी विजय संपादन केला. एक योगायोग लक्षात घ्या-लोकसभेतील लेवा पाटीदारांच्या वर्चस्वाला आधीदेखील आव्हान देण्यात आले होते. १९८४ साली रवींद्रभैय्यांचे वडील प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांनी (तेव्हाच्या जळगाव मतदारसंघातून) आपले नशीब आजमावले होते. मात्र तेदेखील पराभूत झाले होते. तर यानंतरच्या म्हणजे १९८९ सालच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन यांनीदेखील याच मतदारसंघातून लेवा पाटीदार विरोधी धु्रविकरणाचा प्रयत्न केला. मात्र ते त्यात यशस्वी झाले नव्हते. या पार्श्वभूमिवर, २०१४ सालीसुध्दा सामाजिक पातळीवरील वर्चस्वाची लढाई या मतदारसंघात रंगण्याची शक्यता होता. यात मराठा मतांच्या धु्रविकरणाचा महत्वाचा फॅक्टर विचारात घेण्यात येईल असे वाटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा विचार रद्द करत धक्कातंत्र वापरले
राष्ट्रवादीचे गणीत पुन्हा फसले
खरं तर, २०१४ साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीतर्फे मराठा समाजाचाच उमेदवार देण्यात येईल असे मानले जात होते. तथापि, पक्षातर्फे आकस्मिकपणे विधानपरिषदेचे सदस्य मनीष जैन यांना उमेदवारी देण्यात आली. यात अल्पसंख्यांकांच्या ध्रुविकरणाला, मराठा समाजाची जोड व अर्थातच पैसा असे गणित मांडण्यात आले होते. मात्र या लढतीत रक्षाताई खडसे यांनी त्यांचा दारूण पराभव केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची रावेर मतदारसंघातील ताकद ही फारशी जास्त मानली जात नव्हती. यातच रक्षा खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिल्यानंतरही राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्योजक श्रीराम पाटील व नंतर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मराठा विरूध्द लेवा पाटीदार अशा गणितावर विसंबून राहण्याचे मानले जात होते. तथापि, रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडून देत राष्ट्रवादीने या पट्टयातून एका अर्थाने माघार घेतल्याचे मानले जात आहे. अर्थात राष्ट्रवादीचे गणित लागोपाठ तिसर्यांदा फसण्याच्या आधीच त्यांनी मैदानातून बाहेर पडण्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रेरणादायी वाटचाल
डॉ. उल्हास पाटील हे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले आहेत. घराण्यात कोणताही राजकीय वारसा नसतांना त्यांनी पहिल्यांदा वैद्यकीय आणि नंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेली प्रगती ही कुणालाही प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. जिथे एखादी शाळा वा कॉलेज चालवितांना तोंडाला फेस येतो तेथे थेट वैद्यकीय महाविद्यालयापासून विविध उच्च शिक्षणाच्या संस्था यशस्वीपणे चालविण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे हेच व्यवस्थापकीय कौशल्य लोकसभा उमेदवारीत उपयोगात येणार का ? हा आता महत्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या दलीत-मुस्लीम या पारंपरीक भाजपविरोधी मतपेढीला लेवा पाटीदार समाजातील एक माोठ्या वाट्याची जोड मिळाली तर ते रक्षाताई खडसे यांना आव्हान देऊ शकतात. लेवा पाटीदार समाज हा स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रारंभी काँग्रेससोबत होता. १९७८ साली भारतीय लोकदलाचे वाय.एम. बोरोले यांचा अपवाद वगळता येथे १९९१ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्वच होते. त्यानंतर मात्र खुद्द डॉ. उल्हास पाटील यांचा खासदारकीचा १३ महिन्यांचा अपवाद वगळता येथे भाजपनेच वर्चस्व मिळवले असून लेवा पाटीदार समाजातील एकगठ्ठा मतांचा यात मोठा हातभार असल्याचे मानले जात आहे. आता समाजाच्या मतदानाची दिशा ही निकालावर परिणाम करणारी ठरणार आहे.
रक्षाताईंची तयारी जोरात
तर दुसरीकडे रक्षाताई खडसे यांची आधीच जोरदार तयारी झालेली आहे. पाच वर्षात केलेली कामे आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा त्यांना लाभ होऊ शकतो. विरोधकांना तयारीस कमी वेळ मिळणार असल्याचा त्यांना लाभ होईल. अगदी बुथ पातळीपर्यंतचे त्यांचे नियोजन आणि प्रचाराचा पहिला टप्पा त्यांनी पार केला आहे. तर जातीय समीकरणातही त्या कमी पडणार्या नाहीत. याच्या जोडीला भाजपची हक्काची मतपेढी व अन्य लहान-मोठ्या समाजघटकांची साथ त्यांना मिळू शकते. लक्षणीय बाब म्हणजे अलीकडच्या काळात मुस्लीम समाज हा मोठ्या प्रमाणात नाथाभाऊंसोबत असल्याचे दिसून आले आहे. याचा विचार केला असता, रक्षाताई खडसे यांना या सर्व जातीय समीकरणांचा लाभ होऊ शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नाथाभाऊ यांनी रावेर मतदारसंघाच्या अगदी कान्याकोपर्यात विणलेले विश्वासार्ह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाळे हे उपयोगात येऊ शकते. तर, दस्तुरखुद्द जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासाठीही रक्षाताईंचा विजय हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनणार असल्याने त्यांनादेखील झटून कामाला लागावे लागेल. या सर्व बाबींचा रक्षाताई खडसे यांचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताकदीच्या तुलनेत काँग्रेस कमकुवत असल्याची बाबदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही.
दोन्ही उमेदवार उच्चशिक्षीत व स्वच्छ प्रतिमेचे
खरं तर लोकसभेची लढाई ही विचारांची लढाई असते. यात व्यापक विचार महत्वाचा मानला जातो. यातच जातीवर आधारित समीकरणे ही नेहमीच यशस्वी होतील असे नाही. रावेर लोकसभा मतदारसंघाने आजवर हेच सिध्द केलेले आहे. यामुळे गत दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने लेवा पाटीदार विरोधी मतांची एकजुट करण्याचा प्रयत्न विफल झाल्यामुळे त्यांनी येथून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे रावेर मतदारसंघातील दोन्ही अर्थात रक्षाताई खडसे आणि डॉ. उल्हास पाटील हे उमेदवार उच्चशिक्षीत आणी स्वच्छ प्रतिमेचे आहेत. आता त्यांच्यातून बाजी कोण मारणार याचे उत्तर काळच देणार आहे. या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी फॅक्टर हा जातीय समीकरणाचा आहे. २००७ सालच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हरीभाऊ जावळे व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्यात लढत झाल्यानंतर एका तपानंतर लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहे. या मतसंग्रामातील निकालाकडे अर्थातच सर्वांचे लक्ष लागणार आहे.