शिवसेनेच्या खच्चीकरणाचे दुःख का ? ( भाष्य )

राज्यातील विलक्षण धक्का देणार्‍या राजकीय घडामोडींमुळे जनमानस ढवळून निघाले आहे. यात शिवसेनेच्या सद्यस्थितीबाबत विविधांगी विश्‍लेषण केले जात आहे. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी केलेले हे भाष्य आपल्याला सादर करत आहोत.

मला तो काळ आठवतोय सन १९८४ जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये एक दंगल झाली होती. यानंतर ज्यांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खर्‍या अर्थाने जीवाची बाजी लावून रुजवात केली त्या कन्हैये बंधूंची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. शिवसेनेचे तेव्हाचे चोपडा तालुकाध्यक्ष बाळासाहेब कन्हैये आणि त्यांचे बंधू मुरलीधर कन्हैये यांचा पोलीस कोठडीत खून झाला होता. हे एक नियोजनबध्द हत्याकांड होते. यात पोलिसांचा हात असल्याचे उघड असले तरी मात्र यामागील खरा हात आजही अदृश्य आहे. यापेक्षाही ज्या कन्हैये बंधूंनी शिवसेनेसाठी आपलं बलिदान दिलं त्या बंधूंच्या कुटुंबांची आजची अवस्था काय आहे ? घरातली दोन कर्त्या माणसांची हत्या झाल्यानंतर आज कन्हैये बंधूंचे पाठीमागे राहिलेल्या कुटुंबातील स्थिती काय आहे. तर, ते आजही आहे त्याच स्थितीत परिस्थितीशी दोन हात करत जगत आहेत.

मला प्रश्न आहे की ज्या शिवसेनेसाठी या कन्हैया बंधूंनी बलिदान दिले त्या शिवसेनेच्या मुंबईतल्या कोणत्या नेत्याने कधी या दोन्ही भावांच्या कुटुंबाची कधी विचारणा केली आहे का? त्यांचे काय हाल आहेत ते कसे जगतायेत कशी गुजराण करताहेत याची माहिती घेतली आहे का? त्यांना उभे करण्यासाठी काही मदत केली आहे का? तीन वेळा सत्तेत असतानाही त्यांच्यासाठी सत्तेचा काही उपयोग झाला आहे का? त्यांच्या कुटुंबांना मदतीचे तर सोडाच पण त्यांच्या नावाने लहानसे स्मारक तरी उभारण्यात आले आहे का ? हे माझ्यासारख्या सामान्य माणसांना पडलेले प्रश्न आहेत. म्हणून माझा प्रश्न आहे. . . शिवसेनेच्या खच्चीकरणाचे दुःख का?

मी जळगाव जिल्ह्यात काम करताना जिल्ह्यात गणेश राणा, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी प्रकाश व्यास, कै. प्रकाश जगताप, संजय राठोड, बापू ठाकरे, कै सुनील वाडकर, मच्छिंद्र निकम, अशोक मंधान, वसंत सूर्यवंशी, विजय वाडकर यांचे काय हाल आहेत. या मंडळींनी जीवाची बाजी लावून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे रोपटे लावले. भुसावळमध्ये ऍड.जगदीश कापडे कै. राजेंद्र दायमा असतील. या मंडळींनी शिवसेनेला शक्ती दिली. पाचोर्‍यातले राजेंद्र पाटील, चाळीसगावचे तुकाराममामा कोळी, एरंडोलचे बापू पाटील, जामनेरचे डॉ मनोहर पाटील, पाळधीचे गुलाबराव पाटील, धरणगावचे गुलाबराव वाघ यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी अनेक खस्ता खाऊन घरावर तुळशी पात्र ठेऊन कधी जेलमध्ये तर कधी तडीपार होऊन कोर्टात खेटे घालून संपूर्ण आयुष्य दिले. हे सारे सामान्य कुटुंबातील होते. कुणी सायकल दुकान तर कुणी किराणा वा कटलरी दुकान चालवून उदरनिर्वाह करतांना पदरमोड करणार्‍या या पेटलेल्यांनी पन्नास वर्ष शिवसेनेच्या रोपट्याला पाणी दिल वाढवलं वृक्षात रूपांतर करून योगदान दिल. असेच योगदान महाराष्ट्रातल्या अनेक शिवसैनिकांनी दिले म्हणूनच महाराष्ट्रात शिवसेना वाढली. यांच्या अपार निष्ठा व मेहनतीने १९९५ ला शिवसेनेची या महाराष्ट्रात सत्ता आली. या पेटलेल्या शिवसैनिकांनी राज्यभर मेहनत केली नसती तर सत्ता आली असती का?

मला एक आठवतं धुळ्यामध्ये अली बाबा नावाचे पत्रकार होते. धर्माने मुस्लिम जरी असेल तरी हा अत्यंत कट्टर शिवप्रेमी होता. यांनी गाईंचे प्राण वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्याच्या नावावर आज शेकडो केसेस आहेत. हा आज जळगावच्या गेंदालाल मिलमध्ये एका छोट्याशा रूममध्ये उपेक्षित जिवन जगतो आहे. अशा हजारो शिवसैनिकांचे प्रचंड बलिदान या महाराष्ट्राने अनुभवलं पाहिलं. काही अपवाद वगळता खर्‍या कार्यकर्त्यांसाठी शिवसेना सत्तेत आल्यानंतर पक्षप्रमुखांचे वा नेत्यांचे योगदान काय? यांना राज्यसभेला खासदारकी साठी बिगर मराठी चंद्रीका केनिया, मुकेश पटेल, प्रितीश नंदी, प्रियंका चतुर्वेदी पाहिजे. विधान परिषदेत गोपीकिशन बाजोरिया यांच्यासारखे कोट्याधीश बिगर मराठी व्यापारी पाहिजे. पक्षप्रमुखांनी कधी गणेश राणा, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी यांच्या सह इतरांच्या योगदानाची आठवण ठेउन कधी आस्थेने विचारपूस केली तरी का? हा एका जळगाव जिल्ह्याचा प्रश्‍न नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात असे हजारो शिवसैनिक मिळतील. त्यांना कधी ना पदे मिळाली ना प्रतिष्ठा !

आज शिवसेना प्रचंड मोठ्या फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. कुणाला शिव्याशाप देऊन गद्दार म्हणण्यापेक्षा बंडखोरी का झाली लोक बाहेर का आले याचे चिंतन करण्याची खूप मोठी गरज आहे. ही माणसं सहज तर गेली नसतीलच यांचा कुणी स्वाभिमान वा आत्मसन्मान निश्चित दुखावला असेलच. खरं म्हणजे शिवसेना ही मराठी अस्मिता असं केवळ बोलण्यापुरतीच आहे.आज मुंबईच्या प्रत्येक मार्केटमध्ये जा मुंबईच्या प्रत्येक वस्तीमध्ये जा प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी करा तो कुठला आहे. कुठून आला आहे. यामध्ये केवळ एक ते दोन टक्के फक्त मराठी माणूस दिसेल. आम्ही मराठी माणसांची अस्मिता ही भावना कुरवाळत आहोत. या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या नावाचा वापर राजकीय दहशत निर्माण करण्यासाठी केला गेला आहे. कुणाला स्वतःचं राजकीय कर्तुत्व सिद्ध करायचं असेल तर शिवरायांचे नाव वापरणं बंद करावे असे आमचे म्हणणे आहे.

स्वतःच्या वा वडिलांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करा बघा कोण विचारते ते ? सध्या महाराष्ट्रात आज घडीला अनेक नेत्यांच्या चौकशा सुरू आहेत. मुंबईतील एक चाळ आहे त्या चाळीसंदर्भात एका मोठ्या नेत्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. या चाळीमध्ये कोकणातली बाराशे मराठी कुटुंब राहत होते. या कोकणातल्या मराठी माणसांना बेघर करण्याचं काम याच नेत्यांनी केलं. अशा किती चाळी नेस्तनाबूत झाल्या वा केल्या गेल्यात याची कधी तरी तपासणी झालीच पाहिजे. आणी म्हणे मराठी अस्मिता जपणार? मला एक गोष्ट आठवते एक सहा सात वर्षांपूर्वीचा विषय माझे भुसावळचे बंधुतुल्य मित्र संजय भाऊ आवटे हे मला जळगावला भेटायला आले. त्यांनी सांगितलं की मुंबईतील आरे कॉलनी मध्ये माझे मित्र अनिल भाऊ यांनी फ्लॅट घेतला आहे . त्यांनी केवळ चार हप्ते भरले नाही म्हणून बिल्डरने त्याचा फ्लॅट जप्त करून टाकला आता तो त्याच्याकडून २५ लाख रुपये दिले तर फ्लॅट मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुला इथे प्रवेश ही देणार नाही अशा धमक्या देतो आहे असे सांगितले. मी संजू भाऊंना सांगितले की चला बघूया कुठला मोठा बिल्डर आहे आणि कुठला मोठा दादा आहे.आम्ही मुंबईत गेलो माझ्या मार्गदर्शकांना भेटलो त्यांच्यासमोर हे सगळ विशद केलं.

त्यांनी आम्हाला सांगितलं की जा तिथे भेटा.तो काय म्हणतो ते सांगा.पुढे मी बघतो. आम्ही आरे कॉलनी मध्ये जो बिल्डर होता त्याच्या ऑफीस मधे गेलो.त्याची दहशतयुक्त नकारात्मक भुमिका माझ्या मार्गदर्शकांना कळवली. त्यांनी सरळ बिल्डर ला सांगितले की बर्‍याबोलाने मदत केली नाही तर कायद्याची भाषा केली जाईल ! तेव्हा त्या बिल्डरने फ्लॅट दिला.आम्ही जेव्हा माहिती घेतली. तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती अशी मिळाली की या बिल्डरला १९९५ ते १९९९ च्या काळाच ज्यांचे शासन होते. ज्यांचा रिमोट होता त्यांच्या आशिर्वादाने या बिल्डरला त्या आरे कॉलनी परिसरात ५०० एकर जमीन देण्यात आली होती. यामध्ये पन्नास मोठे बंगले आणि पंधराशे मोठे फ्लॅट बांधण्यात आले. या जागेचे भूमिपूजन सुद्धा त्यांच्या नेत्यांच्या हातून झालं अशी कोनशिला होती. ही जागा ज्याला दिली तो मुंबईतला अत्यंत मोठा मुस्लिम समाजाचा दुबई स्थीत बिल्डर होता. जेव्हा हे सत्य आम्ही पाहिलं तेव्हा आम्ही अवाक झालो. नंतर कळले की सदर बिल्डर ज्याने अनेक दुर्दैवी घटना या मुंबईत घडवल्या त्या डॉनचा विश्वासु आहे. आमचा विश्वासच बसला नाही. पण ते खरे निघाले.

यानंतरची घटना अतिशय गंभीर आहे. ओवेसी नावाच्या हैदराबादच्या एम आय एम च्या मुस्लिम नेत्यांनी हा देश काही तासासाठी माझ्या हातात द्या मी संपूर्ण हिंदूंना संपवून टाकेल अशी घोषणा केली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात ओवेसी वर गुन्हे दाखल करण्यात आले. मला माझ्या मार्गदर्शकानी सांगितले की ओवेसी च्या प्रक्षोभक वक्तव्या विरोधात आपण गुन्हे दाखल करुया. मी माझा मीत्र असलेल्या नांदेडच्या जिल्ह्याप्रमुखास विनंती केली की धर्माबाद पोलीस ठाण्यात ओवेसी विरुद्ध दाखल गुन्हयाचा एफआयआर मिळवा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे भाऊ तु या भानगडीत पडू नकोस. अरे आम्ही त्याला खोके-पेटया देतोय. हिंदुंच्या विरोधात बोंबलायला सांगतो तो बोंबलतो म्हणून आम्हाला हिंदूंची मत भेटतात. हे ऐकून तर माझं डोकं बधिर झालं. काय चाललंय सत्तेसाठी! कुठला हिंदुत्ववाद!

त्यानंतर मला एक आणखी गंभीर घटना आठवते ती सिंदखेडराजांची ! १९९८ साली राष्ट्रमाता जिजाऊंची चतुर्थ जन्म शताब्दी होती. मराठा सेवा संघाने यावेळी बिहारच्या मुख्यमंत्री श्रीमती राबडीदेवी यादव आणि उत्तर प्रदेशच्या नेत्या मायावती यांना जिजाऊ पुरस्कार जाहीर केले. दादर च्या भवनातुन फतवा आली की आम्ही श्रीमती राबडीदेवी यादव ज्या भगवान श्रीकृष्णाच्या यादव घराण्यातील आहेत आणि मायावतींना महाराष्ट्रात प्रवेश देऊ देणार नाही. वातावरण प्रचंड तापलं लाखोंच्या संख्येने जिजाऊ भक्त होते. प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त सिंदखेडराजा मधे लावण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी मा.श्री. खेडेकर साहेबांनी माझ्यावर सोपवली . मी तिथं प्रास्ताविकात सांगितलं की या महाराष्ट्राचा सातबाराचा उतारा अजून कोणाच्या बापाच्या नावानं झालेला नाही. कोण म्हणतो येऊ देणार नाही. त्यावेळी गावंडे नामक मंत्री व माझी हातघाई व झटापट झाली. स्वतःचा राजकीय स्वार्थ जपण्यासाठी हिंदुत्वाचा जप करायचा एकीकडे बहुजन-बहुजन करायचं बहुजनांच्या पोरांचा दंगली, आंदोलने, मारामारी, सभा सतरंज्या उचलणे या साठी वापर करायचा. महाराष्ट्रातल्या तरुणांची डोकी खराब करायची असा हा सर्व प्रकार होता. संघटना उभी करतांना किती तरुणांनी अंगावर पोलीस केसेस घेतल्या, आंदोलन केली, शासकीय नोकरी पासुन वंचित राहीले, उध्वस्त आयुष्य जगत आहेत ? यावर कधी तरी विचार व्हायलाच हवा.

शिवसेनेसाठी आयुष्य पणाला लावणारे हे पक्षाकडे सत्ता आल्यानंतर कुठे आहेत ? ते कोर्टाच्या खेट्या मारत आहेत आणि कुठेतरी सायकलचे दुकान असेल चहा ची टपरी असेल छोटे किराणा दुकान असेल.अशा लहान सहान कार्यकर्ते पोटाला चिमटा देऊन उदरनिर्वाह करताहेत. त्यांनीच ही संघटना रुजवली, वाढवली सत्ता प्राप्त करून दिली. आता कोणी बंडखोरी केली वा फितुरी केली. ती का केली.कदाचित त्यांचा आत्मसन्मान दुखावला असेल त्यांच्या स्वाभिमानाल ठेच पोहचवली असेल. वा प्रमुखांचा अहंकार पचला नसेल. हेच कारण असेल ना. याचमुळे शिवसेनेच्या खच्चीकरणाचे दुःख का? हा माझा प्रश्न आहे!

हे काय चाललय महाराष्ट्रात ? हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा सर्वसामान्यांना न्याय देणारा जिजाऊंच्या संस्काराचा महाराष्ट्र ! हा छत्रपती शंभुराजांनी प्रचंड बलिदानाने पावन झालेला महाराष्ट्र! औरंगजेब ला महाराष्ट्रात गाडणार्‍या महाराणी ताराराणींचा महाराष्ट्र ! आता आपल्या महाराष्ट्रात शिवरायांच्या नावे राजकीय स्वार्थ लाटणार्‍या उपर्‍यांना वठणीवर आणायची वेळ आलेली आहे! शिवसेनेने जे काही पेरले तेच उगविले. खरं तर राज्यातील दोन-तीन पिढ्यांमधील लक्षावधी तरूणांच्या आयुष्यभराचे सर्वस्व घेणार्‍या शिवसेनेचे जे काही होईल ते तटस्थपणे अनुभवा. हा काळाने उगवलेला सूड आहे. हा त्या लक्षावधी तरूणांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा तळतळाट आहे. असो.

जय जिजाऊ! जय शिवराय!

अशोक एस.शिंदे

संस्थापक छत्रपती शिवाजी ब्रिगेड

९४२२२८३२३३

Protected Content