अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
अमळनेर येथील विनोद पाटील (शिरूर) व वाल्मीक चौधरी (अमळनेर) यांनी कर्जवसुलीच्या संदर्भात बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास, धमक्या व आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याची तक्रार शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील बजाज फायनान्सचे मॅनेजर दीपक चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी मॅनेजरकडून अत्यंत उद्धट व आक्षेपार्ह पद्धतीने उत्तरे देण्यात आल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

कर्जाचा हप्ता थकीत असल्यास संबंधित वित्तीय संस्थेला कायद्याच्या चौकटीत राहूनच वसुली करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, वसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अपमानित करणे अथवा त्यांच्यावर अवाजवी मानसिक दबाव आणणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही, असे शिवसेना–युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तींचे रीतसर जबाब नोंदवण्यात यावेत, तसेच उपलब्ध फोन कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ व व्हिडिओ पुरावे आणि संबंधित कागदपत्रांची कसून पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनावारे करण्यात आली आहे. चौकशीअंती कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास दोषींवर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना कर्जवसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची धमकी, शिवीगाळ किंवा मानसिक त्रास दिला जाऊ नये, यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला प्रशासनाकडून आवश्यक त्या सक्त सूचना देण्यात याव्यात, असेही निवेदनात नमूद केले आहे.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना–युवासेना नेहमीच ठामपणे पाठीशी उभी राहील. जर भविष्यात ग्राहकांशी अशीच अरेरावी अथवा गैरवर्तन झाले, तर कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहूल भास्कर कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज संतोष शेटे, उपतालुका प्रमुख राहूल साहेबराव पाटील, उपतालुका प्रमुख जयेश रवींद्र चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख राजा अल्ताफ राजा शेख, युवासेना पदाधिकारी ईश्वर जाधव, सचिन विलास पाटील व प्रदीप किरण देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



