जळगाव प्रतिनिधी | ”एकनाथराव खडसे यांच्यावर आपण कोणतीही टिपण्णी करणार नाही. मात्र ज्यांनी ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली. याची प्रचिती आगामी काळात येईलच….जो चोरी करतो त्यांची ईडी लागते” अशा शब्दात भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी खडसेंवर टीका केली. जिल्हा दौर्यावर आले असतांना ते पत्रकारांशी बोलत होते.
याप्रसंगी आमदार आशीष शेलार म्हणाले की, सरकारी यंत्रणेने सातत्याने आकडे लपवले आहेत. सरकारचे खान्देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आपण खान्देश दौरा करत असतांना माहिती मिळाली की, सुमारे दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. यामुळे केवळ घोषणा आणि फक्त सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे माणसे जगवणारांचे नसून मृत्यू पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे.
याप्रसंगी आमदार शेलार म्हणाले की, आ. गिरीश महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाने केलेला नाही. कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीत ते मदतीला धावून गेले असल्याकडे देखील शेलार यांनी लक्ष वेधले. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. तर एकनाथराव खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा विषय आता जुना झाला आहे. आपण खडसे यांच्यावर वैयक्तीक टीका करणार नाही. तथापि, ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये दुध का दुध पानी का पानी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर चोरी करणार्यांच्याच मागे ईडी लागते असा टोला देखील आशीष शेलार यांनी मारला.
याप्रसंगी आशीष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याची कोणतीही पूर्तता करण्यात आली नाही. तसेच कोरोनाच्या काळात देखील सरकारची कामगिरी ही अतिशय निराशाजनक अशीच आहे. यातच भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे बाहेर आली आहेत. लसीकरणाचे नियोजन देखील फसले असल्याचे ते म्हणाले. तर अनिल परब हे परिवहन मंत्री नसून परिवार मंत्री असून ते एकाच परिवाराची सेवा करत असल्याची टीका त्यांनी केली. गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेते देण्याची ऑफर दिल्याच्या विषयावर ते म्हणाले की, गुलाबरावांनी स्वत:चे काही तरी तयार करावे, दुसर्यांच्या मुलांवर लक्ष ठेवू नये. तर भुसावळ येथील अनिल चौधरी यांच्या पोलिसांसोबतच्या नृत्याबाबत आपल्याला काही माहित नसल्याचे शेलार म्हणाले. यावर संजय सावकारे यांनी हा प्रकार आधीपासूनच सर्वांना माहित असल्याची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष पोपट भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, मधुकर काटे, मोहन जोशी, हर्षल पाटील, मनोज भांडारकर, नितीन इंगळे आदींची उपस्थिती होती.
खालील व्हिडीओत पहा आ. आशीष शेलार नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/545330363324646