गिरीशभू आता जळगावला वेळ द्या ! : ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारींचे पत्र

girish mahajan welcome jalgaon

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना आता भरपूर वेळ मिळणार असून त्यांनी जळगावकरांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त करणारे अनावृत्त पत्र ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी लिहले आहे. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या वाचकांसाठी हे पत्र जसेच्या तसे…!

माजी मंत्री गिरीशभू यांना पत्र…

जळगाव शहराला वेळ द्या !

आदरणीय आमदार तथा माजीमंत्री गिरीशभू

नमस्कार. नियतीने भारतीय जनता पक्षाला सक्तीने सत्तेबाहेर बसविले आहे. तुमची सोबत असणारे, महायुतीची घोषणा देणारे सहकारी तुम्ही ओळखू शकला नाहीत. गावभर संकटमोचक म्हणून वावरताना आपलेच सहकारी संकट उभे करतील, हे तुम्हाला, तुमच्या पक्षाला उमगले नाही. माणसे ओळखण्याचे तुमचे आकलन ढीसाळ आहे, हे यानिमित्ताने समजून-उमजून घ्या. मुंबई पासून तर जळगावच्या सर्किट हाऊसपर्यंत गोळा होणाऱ्या गर्दीत घात करणारे बहुसंख्य गारदी आहेत, हे ओळखण्याची हीच वेळ आहे. राज्याची सत्ता तुमच्या हातून गेली पण आम्ही जळगावकरांनी स्थानिक सत्ता तुमच्या हाती दिली आहे, त्याची आठवण करा.

जळगावकरांनी ७५ पैकी ५७ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. महापौर भाजपच्या झाल्या. शहराचा आमदार दुसऱ्यांदा भाजपचा झाला. व्यक्तिशः मी तुमच्या पक्षाला मतदान केले आहे. मात्र गिरीशभू तुम्ही मुंबई – जळगाव सर्किट हाऊस – जामनेर अशा फेऱ्यांमध्ये व्यस्त राहिलात. कधीतरी गणपतीच्या आरतीला, कधी तरी रामरथ यात्रेत आरती करताना दिसलात. जळगाव शहराच्या अडीअडचणींवर कधी जळगावकरांशी संवाद साधल्याचे आठवते का, गिरीशभू तुम्हाला ? तुमच्या अगोदर चंद्रकांत पाटील जिल्हा कारभारी होते. त्यांनी मंत्री म्हणून किमान जनसंपर्क कार्यालय सुरु केले होते. पाटील जेवायला जळगावमधील ठराविक मान्यवरांकडे जात. अर्थात, अशा जेवणाच्या ठिकाणी मंत्र्यांशी बोलून जळगावचा प्रश्न निकाली लागला असेही उदाहरण नाही. हा सर्व प्रकार आता ‘बैल गेला आणि झोपा केला’ याच प्रकारातला आहे.

गिरीशभू तुमचे काय आहे जळगावात ? जीएम फाऊंडेशन या तुमच्या खासगी कार्यालयात संपर्काची जागा आहे. मंत्री म्हणून तुम्ही कधी जळगावकरांना भेटत होता अशी जागा आहे का कुठे ? गेल्या ४ वर्षांत तुमच्या भोवतालच्या कोंडाळ्याचे फोटो काढून पाहा. २/३ लोकांचेच चेहरे तुम्हाला दिसतील. ज्याला विधानसभेवर नेले, ज्याला आमदार केले, जे माजी आमदार इकडून – तिकडे उड्या मारतात असे तेच ते २/३ जण. जळगावात हीच माणसे आहेत का, गिरीशभू ? कधी तरी दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस निमित्ताने जळगावकरांना बोलवा आणि विचारा, मी जळगावसाठी काय करु ?

महायुतीचा फुगा फुटला. या फुग्याला भाजपने कुरवाळलेल्या बंडखोरांनी टाचण्या टोचल्या. हाच विषय शिवसेनेने जिव्हारी लावून घेतला. महायुतीच्या फुग्याला जळगाव जिल्ह्यातून ४ टाचण्या टोचल्या. ते ४ बंडखोर तुमचेच होते. हे तुम्ही नाकारु नका. कारण एक बंडखोर तुमच्या वाढदिवसाला तुमचे आश्रयस्थान जीएम फाऊंडेशनमध्येच घुसून बसले होते. गिरीशभू अशाच कांगाव्यांमुळे शिवसेना दुरावली. तुमच्या या कांगाव्यातील समर्थक हिस्सेदार यापुढे तरी लांब सरकवा.

नियतीने आता तुम्हाला आमदार म्हणून फावला वेळ दिला आहे. विधीमंडळात किमान ६ महिने तरी भाजपला विरोधात बसावे लागेल. हा वेळ जळगावकरांसाठी द्या. तुमचाही बंगला जळगावात असेल तर तेथे मुक्कामी थांबा. जळगावमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोला. जळगाव मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्षम करा. अस्वच्छता, खड्डे, डास – मच्छर, डेंग्यु, दुर्गंधी, अतिक्रमण, महामार्गावरील अपघात, वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापारी गाळे भाडे वसुली अशा विषयांमध्ये लक्ष घाला. गिरीशभू जळगावला वेळ द्या ! आमदार म्हणाले, जळगावसाठी ११७६ कोटी आले आहे. गिरीशभू हा निधी कोणाच्या खिशात जातोय ? हे सुध्दा तपासा. नाहीतर नाव घंटागाडी आणि घंटा गायब असेच व्हायचे.

(आ. गिरीशभू पत्रात गारदी हा शब्द आहे. गारदी म्हणजे कोण ? असा प्रश्न तुमच्या लाभार्थ्यांना पडेल. पेशव्यांच्या वाड्यात राहणाऱ्या राघोबादादांनी पुतण्या नारायणराव पेशवा याचा खून करायला गारदी बोलावले होते. हे गारदी शनिवारवाड्याचे रक्षक होते. तेच ऐनवेळी फितूर झाले. काकाने पुतण्याचा घात केला. गारदी हे असे असतात. सोबत राहून कधीही फितूर होतात.)

जे वाटले ते पत्रात थेट लिहिले आहे. तुम्हाला राग येणार नाही. भोवतीच्या लाभार्थी किंवा पंटरांना येऊ शकतो. मात्र त्यांनी हे अंगावर न घेण्यातच शहाणपण आहे.

चला पुन्हा कधी तरी पत्र लिहिण्याची संधी द्या !

दिलीप तिवारी

तमाम जळगावकरांच्या मनांतील विचारांना थेट शब्दांत मांडणारा एक जळगावकर

Protected Content