मुंबई-वृत्तसेवा । केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ नियमित जागा आणि १ पोटनिवडणूक अशा एकूण १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असला, तरी ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकूण १० जागांसाठी १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने कोणतीही चुरस उरलेली नाही.

दरम्यान, तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी त्यांना आवश्यक असलेल्या १० आमदारांच्या सूचक स्वाक्षऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद होण्याची शक्यता असून, निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार भाजपचे ६, शिवसेनेचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि महाविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून येणार आहे. एका उमेदवारासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असताना महायुतीकडे भक्कम संख्याबळ असल्याने त्यांचे उमेदवार सहज विजयी ठरणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मर्यादित संख्याबळामुळे त्यांना केवळ एकच जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूणच, कोणताही अतिरिक्त उमेदवार रिंगणात नसल्याने ही निवडणूक औपचारिकतेपुरतीच राहणार असून, सर्व १० उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.



