एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील नांदगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश बापू सैंदाणे (वय ३८, रा. नांदगाव) आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून, २६ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी वाल्मीक भिला सैंदाणे याने व त्याच्या नातेवाईकांनी योगेश सैंदाणे यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे स्वरूप वाढल्याने संशयित आरोपी वाल्मीक भिला सैंदाणे, भिला धनगर सैंदाणे आणि सुशिला भिला सैंदाणे यांनी योगेश सैंदाणे यांच्यासह त्यांच्या पत्नी काजल आणि आई प्रांताबाई यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून पडली आहे. तसेच, आरोपींनी पीडितांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या हल्ल्यात योगेश सैंदाणे, त्यांच्या पत्नी आणि आई गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आईच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले आहे. याप्रकरणी योगेश सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर भिका शिंदे करत आहेत.



