जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये नुकतेच जिल्हा कारागृह-२, जळगाव येथे विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहातील बंदींना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल आणि तरतुदींबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन बनसोड उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. श्री. बनसोड यांनी ‘न्यायालयीन बंदी अधिकार’ या महत्त्वाच्या विषयावर बंदींना विस्तृत माहिती दिली.
यावेळी अॅड. अब्दल कादीर अब्दुर करीम (मुख्य लोकअभिरक्षक, जळगाव) आणि अॅड. मंजुळा मुंदडा (उपमुख्य लोकअभिरक्षक, जळगाव) यांनी ‘बंदींसाठी कायद्यातील तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच, अॅड. शिल्पा रावेरकर (सहाय्यक लोकअभिरक्षक, जळगाव) यांनी ‘अमली पदार्थांच्या सेवनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम’ या गंभीर विषयावर प्रबोधन केले.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक जी. ए. मानकर, डी. जी. चव्हाण, सहायक अधीक्षक आर. ए. देवरे आणि सहायक लोकअभिरक्षक अॅड. सागर जोशी यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी प्रमोद बी. ठाकरे, संतोष एस. तायडे, राहुल साळुखे आणि जितेंद्र भोळे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.