कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UICT) संस्थेतील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आज या यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाने UICT मधील बी. टेक. केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते. यासाठी मुंबई येथील कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि रायगड येथील सुप्रीम पेट्रोकेम लि. या नामांकित कंपन्यांनी UICT च्या सेमिनार हॉलमध्ये मुलाखती घेतल्या.

या मुलाखतींमधून कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि., मुंबई या कंपनीत निकिता चौधरी आणि निकिता कोळी या दोन विद्यार्थिनींची निवड झाली. तर, सुप्रीम पेट्रोकेम लि., रायगड या कंपनीत प्रसाद ठाकूर, प्रशांत पाटील, राम साखरे आणि जयेश पाटील यांची निवड झाली. याशिवाय, प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधील अमित कोळी याचीही निवड झाल्याने एकूण सात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे. या यशाबद्दल कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.