मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणीच्या घरातून लॅपटॉप लंपास


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील साई संस्कार कॉलनी परिसरातून भरदिवसा एका तरुणीच्या घरातून १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना २२ मे रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनीत वास्तव्यास असलेल्या निकीता विनोद पाटील (वय २५) या एका खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरी करतात. कंपनीकडून त्यांना काम करण्यासाठी लॅपटॉप देण्यात आला होता. २२ मे रोजी सकाळी निकीता पाटील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या.

मॉर्निंग वॉकवरून घरी परतल्यानंतर आणि ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना, त्यांना लॅपटॉप ठेवलेली बॅग दिसली नाही. त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला, परंतु लॅपटॉप कुठेही आढळून आला नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निकीता पाटील यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.