Home Cities जळगाव दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिस अलर्ट ; सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंग...

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिस अलर्ट ; सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंग वाढवले

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असताना जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोशल मीडियावरील सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कोणताही आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारा मजकूर प्रसारित होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सायबर पथक सक्रिय केले आहे.

दिल्लीतील आंदोलनाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित होत असल्याची दखल घेत जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थी किंवा इतर नागरिकांकडून अजाणतेपणाने कायदेशीर अडचणी निर्माण होतील अशा स्वरूपाचे पोस्ट अथवा संदेश प्रसारित होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून सातत्याने जनजागृतीबरोबरच तांत्रिक पातळीवर देखरेख ठेवली जात आहे.

यासाठी सायबर पोलिसांचे दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत करण्यात आले असून फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, व्हिडिओ, रील्स आणि संदेशांवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद अथवा चिथावणीखोर मजकूर आढळल्यास त्याची तत्काळ पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. जळगाव पोलिसांनी यापूर्वीही सोशल मीडियावर गुन्हेगारी कृत्यांचे उद्दात्तीकरण करणारे व्हिडिओ, पोस्ट आणि अकाउंट्सविरोधात कारवाई केली होती. त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा, यासाठी सायबर शाखा विशेष दक्षता घेत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी नागरिकांना आणि विशेषतः युवक-विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. अफवा, दिशाभूल करणारा मजकूर किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पुढे पाठविणे टाळावे, तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांमध्ये जबाबदार डिजिटल वर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जळगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound