ट्रॅव्हल्स बस पलटी, मोठा अनर्थ टळला; ५० प्रवासी थोडक्यात बचावले

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अमोदा येथे रात्री सुमारास भुसावळहून इंदूरकडे जाणारी शाईन ट्रॅव्हल्स (एमपी ३७ पी ९०९०) पावसाळ्यात वळणाचा अंदाज न आल्याने शेतात पलटी झाली. या अपघातात बसमधील अंदाजे ५० हून अधिक प्रवाशांनी प्रवास करत असतानाही सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर डॉ. खाचणे यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात घडल्यानंतर बसचा चालक आणि वाहक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. प्रवाशी दत्तात्रय कानडे यांनी सांगितले की, “आम्हाला काही समजण्याच्या आतच गाडी पलटी झाली होती. वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी सरळ शेतात घुसली आणि पलटी झाली.”

या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. सावदा येथून आलेल्या रुग्णवाहिका चालक आणि स्थानिकांनी जखमी तसेच इतर प्रवाशांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलवले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, या घटनेने पावसाळ्यातील वाहतूक सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.