जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील विठ्ठलपेठ परिसरातील रहिवासी हिरालाल नारायण चौधरी (वय ५२) यांनी १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिरालाल चौधरी हे एका खासगी कंपनीत काम करत होते. ते आपल्या पत्नी, एक मुलगा व एक मुलगीसह विठ्ठलपेठ येथे राहत होते. १४ मे रोजी ते घरातून अचानक निघून गेले होते. १५ मे रोजी त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून, “मी येणार नाही, घरी लक्ष ठेव,” असे सांगितले होते. त्यानंतर कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते.
१६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात एका स्थानिक नागरिकाला झाडाला गळफास घेतलेली व्यक्ती आढळली. तातडीने याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. चौकशीअंती सदर व्यक्ती हिरालाल चौधरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरू आहे.