यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नगर परिषद व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी वाया जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही गळती सुरू असून, प्रशासनाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे संपूर्ण परिसरात चिखल साचला असून, परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या घटनेमुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. “शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस असलेली पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून, येथील व्यापारी आणि व्यावसायिकांना चिखलामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने ही गळती दुरुस्त करावी आणि शहरात विविध ठिकाणी वारंवार होत असलेल्या जलवाहिनी गळतीकडे मुख्याधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे,” असे नितीन सोनार यांनी म्हटले आहे.
यावल शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.