नाशिक | एखादा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत असतांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी रांगेत बराचवेळ उभे राहुन तिकीट काढण्याच्या अनुभवातुन आमची मागची पीढी गेलेली आहे. आजच्या पीढीला मात्र आपल्या वेळ, ठिकाण इत्यादींच्या सोयीनुसार मल्टीप्लेक्समध्ये जाऊन हवा तेव्हा चित्रपट पाहायला मिळतो. या पार्श्वभुमीवर ‘कोती’ या चित्रपटाचा विशेष शो मात्र एक विलक्षण वेगळा अनुभव देऊन गेला.
सुहास भोसले या तरुण दिग्दर्शकाशी परिचय झाल्यापासुन या चित्रपटाबद्दल ऐकत आलो होतो आणि त्यामुळेच चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महोत्सवांत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत पाहण्याची सुवर्णसंधी लाभली. तृतीयपंथीयांच्या विषयावर हा चित्रपट आहे, हे जरी ज्ञात झाले असले तरी चित्रपटाच्या कथेबाबत काहीच कल्पना नसल्याने उत्सुकता होती.
कोती ही ग्रामीण भागात राहणार्या एका चौकोनी कुटुंबाची कथा असली तरी तिची व्याप्ती समाजातील एका उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकाशी निगडीत आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनावर आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. मात्र कोती हा चित्रपट या श्रेणीतील आजवरच्या सर्व चित्रपटांपेक्षा सर्वार्थाने वेगळा असा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हीच या चित्रपटाचा खरा आत्मा आहे. आपल्याच कथेच्या एका धाग्याभोवती राज दुर्गे यांनी पटकथेची सुंदर वीण विणली आहे. पडद्यावर ती पाहतांना प्रेक्षक त्यात पुर्णपणे समरस होऊन जातो. कथानक सांगितल्यास चित्रपटाबाबतची उत्सुकता कमी होऊ शकेल म्हणुन तो मोह आवरता घेत आहे. आशय जरी माहित असला तरी कथेबाबत पुढे ती काय वळण घेणार याचा जरा देखील अंदाज बांधता येत नाही यातच चित्रपटाचे खरे यश दडलेले आहे. कथेचा विषय हा जरी चाकोरीबाह्य असला तरी ती आपल्याच आजुबाजुला घडत आहे असे वाटत रहाते.
चित्रपटाने सुरवातीपासुन घेतलेली पकड शेवटपर्यंत जरादेखील सैल होत नाही. रुढ अर्थाने ‘कोती’ ही एका परिवाराची, दोन भावंची कथा आहे. यात एका भावाची दुसर्या भावासाठीची झुंज पडद्यावर पाहतांना काही प्रसंगात किंचित विनोदाची झालर असली तरी डोळ्यांच्या कडा पाणावतात. राज दुर्गे यांनीच लिहिलेले संवाद कथेच्या अनुषंगाने समर्पक आहेत. सुहास भोसले यांचा हा स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न पण तसे कुठेही जाणवत नाही. अतिशय संवेदनशील विषय भोसले यांनी अतिशय ताकदीने हाताळला आहे. विषय बोल्ड असुन कुठेही अश्लिल तथा बीभत्स असे संवाद नाहीत की भडक दृश्येही नाहीत तरीही अपेक्षित परिणाम साधला जातो ही त्यांच्या प्रगल्भ दिग्दर्शनाची जणु साक्षच आहे. एकही दृश्य विनाकारण कोंबलेले वाटत नाही की चित्रपट मुळ आशयापासुन कुठेही भरकटत नाही.
सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. पण दिव्येश मेदगे आणि आज्ञेश मुंदशींगकर या दोन्ही बालकलाकारांनी यात बाजी मारली आहे. दिव्येशने साकारलेले शाम हे पात्र तर कथेचा आणि पर्यायाने चित्रपटाचा प्राण आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभुमी नसतांना आज्ञेश मुंदशींगकरने आपल्या पहिल्याच चित्रपटात आपले लक्ष वेधले आहे. संजय कुलकर्णी यांनी वडिलांच्या भुमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे. मुलांबद्दल वाटणारे प्रेम, सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांचे कठोर होणे हे भाव त्यांनी चांगले दाखवले आहेत. आईची भुमिका साकारणाऱ्या विनिता काळे यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे. अखेरच्या तोल सुटण्याच्या प्रसंगात त्यांनी प्रभावित केले आहे. मोहिनीरण गटणे यांचा सरपंच यथायोग्य. संदेश जाधव या अभिनेत्याच्या वाट्याला एकच प्रसंग आलेला असुन देखील तो लक्षात राहतो. हर्षदा भावसार लावणी नृत्यात ठिक. सदर लावणी देखील कुठेही उथळ होऊ दिलेली नाही हे विशेष. ‘इश्काचं वारं घोंगावलं’ हे संजय नवगिरे यांचे लावणीगीत आणि बबन अडागळे-मनोज नेगी यांचं संगीत तसेच पार्श्वसंगीत चित्रपटाला साजेसे असेच आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजु समाधानकारक आहे.
निर्माते डॉ. संतोष पोटे आणि डॉ. सुनिता पोटे यांनी कमी बजेटमधे एक दर्जेदार चित्रपट दिला आहे. ‘कोती’ तृतीयपंथीयांच्या केवळ व्यथा मांडत नाही तर त्यांची मानसिकता उलगडत प्रेक्षकांची मानसिकता बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. चित्रपट पाहुन आल्यानंतर तो डोक्यात विचारांतुन घोळत रहातो, तृतीयपंथीय या समाजातील उपेक्षित घटकाबाबत वाटणारा तिरस्कार, किळस कमी होऊन दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडतो. हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
– श्रीराम वाघमारे, नाशिक