नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाला वेग आला असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाने (SIT) तब्बल सहा तास चौकशी केली. नाशिक येथे झालेल्या या चौकशीत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः उपस्थित राहून चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अशोक खरातसोबतचे संबंध, धार्मिक कार्यक्रम, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संपर्क याबाबत त्यांना सखोल प्रश्न विचारण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान रूपाली चाकणकर यांना अशोक खरातची ओळख कधीपासून आहे, ‘शिवनिका’ संस्थेशी संबंधित असताना त्याच्या गैरप्रकारांची माहिती होती का, तसेच खरातसोबत करण्यात आलेले पूजा-विधी नेमके कोणत्या उद्देशाने होते, याबाबत विचारणा करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ कोणत्या कार्यक्रमांतील आहेत, याचाही तपशील मागवण्यात आला.

तपास यंत्रणेकडून धार्मिक विधींच्या नावाखाली काही आर्थिक व्यवहार झाले होते का, हे देखील तपासले जात आहे. खरातशी संबंधित व्यवहार कोणत्या बँक खात्यांतून झाले, तसेच त्याच्या मंदिरात येणाऱ्या इतर राजकीय नेत्यांना कोणी पाठवत होते, यासंदर्भातही एसआयटीने चाकणकर यांना प्रश्न विचारले.
चौकशीदरम्यान रूपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना अशोक खरातला केवळ आध्यात्मिक श्रद्धेपोटी ‘गुरू’ मानल्याचे सांगितले. “आमचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे. त्यामुळे श्रद्धेपोटी आम्ही अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानले होते. मात्र, त्याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती. माझे त्याच्याशी कोणतेही आर्थिक संबंध नाहीत आणि मी कोणालाही त्याच्याकडे जाण्याचा आग्रहही केला नाही,” असा दावा त्यांनी चौकशीदरम्यान केला.
सहा तासांच्या चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. “पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरे दिली आहेत. तपासासाठी जे काही सहकार्य लागेल, ते मी पूर्णपणे करेन. चौकशीचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत असून, अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी त्याचे संबंध तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



