जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाच्या २०२२ च्या शासन निर्णयानुसार पोलिस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची पहिली बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत महिला सुरक्षा, बालकांवरील अत्याचार प्रतिबंध, पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून गठीत करण्यात आलेल्या या समितीत पोलिस अधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक प्रदीप ठाकूर आणि भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पाटील सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय डॉ. रेणुका चव्हाण, अॅड. अनुराधा एल. वाणी, अॅड. भारती कुमावत, कांचन नारखेडे, प्रतिभा सूर्यवंशी, राजश्री महाजन, विद्या सोनार आणि भाग्यश्री सोनवणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

समितीच्या पहिल्याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हे प्रतिबंधासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत लहान मुलांशी संबंधित गुन्हे, त्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अशा प्रकरणांमध्ये करावयाची कायदेशीर कारवाई याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
जळगाव शहरात लवकरच २५ ठिकाणी पॉक्सो आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याशिवाय संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रमाणित आणि माहितीपूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यात येणार असून ते सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दाखवले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, महिलांवरील गुन्हे, पॉक्सो कायदा आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत नवीन दामिनी पथकांच्या कामकाजावरही चर्चा झाली. शाळा आणि महाविद्यालय परिसरात या पथकांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नियमित पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दामिनी पथक अधिक सक्रियपणे काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, येत्या १८ तारखेला सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व ‘पोलिस दादा’ आणि ‘पोलिस दीदी’ यांची विशेष कार्यशाळा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद, महिला सुरक्षा आणि सामाजिक जनजागृती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.



