जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर गावातून एका दहा वर्षीय मुलाला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवार, १८ जून रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दिनेश बारेला (वय १०, रा. मध्यप्रदेश, ह.मु. भोकर, ता. जळगाव) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
नातेवाईकांकडून शोधमोहीम, अखेर पोलिसांत तक्रार
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आकाश बारेला हा आपल्या कुटुंबीयांसह जळगाव तालुक्यातील भोकर गावामध्ये वास्तव्याला आहे. १६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून आकाश घरी नव्हता. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, त्याच्या मामीने जळगाव तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. यात अज्ञात व्यक्तीने आकाशला काहीतरी आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेले असल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी करत आहेत.