मोठी बातमी : शालकाने केला मेव्हण्याचा विश्वासघात: ३ कोटींचा गंडा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यवसायासाठी थोडे-थोडे करून घेतलेले तब्बल चार किलो सोने परत न देता सराफ व्यापाऱ्याची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सन २००८ ते २०१४ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (वय ४५, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास संपादन करून सोन्याची अफरातफर
सुवर्ण व्यावसायिक , सुनील दिनानाथ सराफ (वय ५५, रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दुकान आहे. त्यांचा शालक अमित सोनार याने त्यांचा विश्वास संपादन केला. नंदुरबार येथील आपल्या दुकानावर दागिने बनवण्यासाठी त्याने सुनील सराफ यांच्याकडून थोडे-थोडे सोने घेतले. सन २००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत, अमितने ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम या प्रमाणात असे एकूण चार किलो सोने घेतले. या सोन्यातून त्याने दागिने बनवून ते स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले. मात्र, सराफ यांना पैसे किंवा सोने परत देण्याबाबत टाळाटाळ करत त्याने ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

अखेर पोलिसांत तक्रार दाखल
तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत मिळत नसल्याने, सुनील सराफ यांनी अखेर शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अमित सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एवढी वर्षे होऊनही सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वारंवार सोने मागण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटीही करण्यात यायची, असे सराफ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.