केळीवरील विषाणूजन्य रोगाची पथकाने केली पाहणी

keli pahani

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केळी पीकावर सीएमव्ही व्हायरसमुळे रोगाची लागण झाली असून याची पुणे व दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने पाहणी करून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावल आणि रावेर तालुक्यात सीएमव्ही व्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने केळी उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याची दखल घेऊन ना. हरीभाऊ जावळे यांनी सेव्ह बनाना ही मोहीम सुरू करण्याची घोषणा केली असून याच्या अंतर्गत शेतकर्‍यांची मदत करण्यास प्रारंभ केला आहे. याच्या अंतर्गत शनिवारी पुणे आणि दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या एका पथकाने विविध गावांमध्ये जाऊन केळीवरील रोगाची पाहणी केली. वाघोदा, विवरे, वडगाव, चिनावल, कुंभारखेडा आदी शिवारांमध्ये ही पाहणी करण्यात आली. पथकात दिल्ली, पुण्याचे डॉ. राजवर्मा, व्हायरॉलॉजी विभागाचे डॉ. त्रिपाठी, डॉ. बडगुजर, व्ही. एस. सुपे, जळगावच्या केळी संशोधन केंद्राचे डॉ. शेख उपस्थित होते.

या पथकाने शेतकर्‍यांना काही उपायोजना सुचविल्या. यात व्हायरसची लागण झालेली झाडे नष्ट करणे, खतांचा योग्य वापर करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याच प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत ना. हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सीएमव्ही व्हायरसमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून त्यांना तातडीने मदत मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

Protected Content