Home क्राईम रावेरमधील 300 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर आगीत भस्मसात; ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान

रावेरमधील 300 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर आगीत भस्मसात; ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री लक्ष्मीनारायण मंदिराला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण मंदिर जळून खाक झाले. या घटनेमुळे रावेर शहरात हळहळ व्यक्त होत असून, सुमारे 300 वर्षांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा काही तासांत राख झाल्याने भाविकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. रात्री उशिरा लागलेल्या आगीची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

रावेर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे सन 1700 च्या सुमारास बांधण्यात आलेले असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून या मंदिराची ओळख होती. संपूर्ण सागवान लाकडापासून उभारण्यात आलेल्या या मंदिरामध्ये अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकाम करण्यात आले होते. मंदिरातील लाकडी रचना, कोरीव काम आणि प्राचीन स्थापत्यकला हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजेच्या सुमारास मंदिरातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसल्या. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने मंदिरातील संपूर्ण सागवान लाकूड पेट घेऊन जळू लागले. माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या मनमोहक मूर्ती असलेले हे मंदिर काही वेळातच आगीच्या विळख्यात सापडले. आगीमुळे मंदिरातील प्राचीन लाकडी नक्षीकाम, आतील सजावट आणि धार्मिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच रावेर, सावदा आणि फैजपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत मंदिराचा मोठा भाग पूर्णपणे जळून खाक झाला होता. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य केले.

या घटनेमुळे भाविक आणि नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भाविकांनी मंदिर परिसरात धाव घेत मंदिराच्या अवशेषांकडे पाहत हळहळ व्यक्त केली. शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग असलेले मंदिर नष्ट झाल्याने नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट की अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत प्रशासन आणि संबंधित विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून नुकसानाचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

रावेर शहरासाठी श्रद्धास्थान असलेले लक्ष्मीनारायण मंदिर आगीत भस्मसात झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. या घटनेमुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासन आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता भाविकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound