केजरीवाल सरकार कन्हैया कुमारच्या पाठीशी

kanhaiya kejriwal 05 1457162653

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | आम आदमी पार्टीचे सरकार कन्हैया आणि अन्य ९ लोकांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना परवानगी देणार नाही. फेब्रुवारी २०१६ मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जे.एन.यु.) संकुलात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान कथित देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशविरोधी घोषणा देण्याचा कन्हैया आणि अन्य लोकांवर आरोप आहे.

 

जेएनयूत झालेल्या या कार्यक्रमातील गोंधळाचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर जेएनयू विद्यार्थी परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक करण्यात आली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी याप्रकरणी आपले मत मांडले आहे. त्यांनी सांगितले आहे की, पोलिसांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कन्हैया आणि अन्य विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकत नाही.

ज्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे, तेथे आप सरकारचे हे म्हणणे मांडले जाणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना देखील या प्रकरणी दिल्ली सरकारचे म्हणणे काय आहे, त्याची कल्पना दिली जाणार आहे. देशद्रोह आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये कोर्ट पोलिसांच्या आरोपपत्रावर सुनावणी घेऊ शकत नाही. त्यासाठी संबंधित राज्याच्या गृहमंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र अंतिम निर्णय कोर्टावरच अवलंबून असेल.

Protected Content