नवाब मलिक यांनी सुचवली मेट्रो कारशेडसाठी नवीन पर्यायी जागा

metro car shed

मुंबई प्रतिनिधी । मुंबई मेट्रोसाठी ‘आरे’मधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याची घोषणा पहिल्या कॅबिनेट बैठकीत करण्यात आली. ‘आरे’च्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भुमिका रा.कॉ.चे आमदार नवाब मलिक यांनी घेत  मुंबई मेट्रोसाठी नवा पर्याय सुचवला आहे.

दरम्यान आता यापुढे एकाही झाडाचे पान आता तोडले जाणार नाही. आमचा विरोध मेट्रोला नाही, मात्र हा पर्यावरणाच्या ऱ्हास होत आहे., अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई मेट्रोबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप केला. आरेच्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारशेडसाठी 30 हेक्टर जागेची गरज आहे. एसआरपीएफ कँम्पमध्ये 41 हेक्टर जागा असून मुख्यमंत्र्यांनी या जागेचा विचार करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी आज सभागृहात केली.

मुंबई मेट्रो हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मेट्रोचे कारशेड आरेमध्ये प्रस्तावित केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. पर्यावरणप्रेमींनी उग्र आंदोलने केली. मात्र सरकारने ही आंदोलने चिरडून टाकली. त्यानंतर एका रात्रीत सरकारने प्रस्तावित जागेवर आवश्यक असणारी सर्व झाडे कापून टाकली होती.

रात्रीच्या अंधारात झाडे कापल्यामुळे एकच जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी सत्ता आल्यानंतर आरेला जंगल म्हणून घोषित करु, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसल्यानंतर ते आरेबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे.

Protected Content