नसते नियम शिकवण्याच्या भानगडीत पडू नका : रऊफ खान

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या निवडीबाबत आम्हाला नसते नियम शिकवण्याच्या भानगडीत पडू नका असा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्या आघाडीचे शहराध्यक्ष रऊफ खान बाबू खान यांनी एका पत्रकान्वये केला आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्यामुळे लाभ मिळाला असल्याचा दावा केला होता. यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांच्या गटाने पत्रकार परिषद घेऊन समितीमुळेच ही प्रकरणे मंजूर झाल्याचे सांगत खडसे यांच्यावर टिका केली होती. या टिकेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रऊफ खान बाबू खान यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

 

या पत्रकात म्हटले आहे की, संबंधीत व्यक्ती पत्रकार परिषदेत आरोप करताना हे बोलले की प्रकरणे आमच्या समितीने मंजूर केले. मात्र अजून एक महत्वाची गोष्ट हे लोक त्यांच्याच तोंडून सांगायला विसरले नाहीत की प्रलंबित १२०० प्रकरणे होती त्यापैकी ०९/०६/२०२३ ला मिटिंग घेऊन  ९०४ प्रकरणे मंजूर केली व ४५० प्रकरणे त्रुटी अभावी अजूनही प्रलंबित आहेत. हाही आकडा त्यांना बेरीज-वजाबाकी येत नसल्यामुळे नीट सांगता आला नाही तरीसुद्धा  यांचं कौतुक केलं पाहिजे की यांनी सांगितलं की आम्हाला ९ जुन ला तेंव्हाच जाग आली जेंव्हा त्याच्या अगोदरच ६ जुनला रोहिणी खडसे आणि आमदार एकनाथराव खडसे हे स्वतः तहसिल कार्यालयात आले होते.

 

यात पुढे म्हटले आहे की, तेथे उपस्थित एका व्यक्तीने सांगितले की माझं स्वताच प्रकरण आहे. परंतु येथे प्रकरण मंजूर करण्यासाठी काही दलाल बाहेर फिरत असताना त्यांना  एक हजार रुपये देईल त्यांचेच प्रकरण समिती मंजूर करते व बाकी त्रुटीत टाकले जातात. त्यावेळेस तहसीलदार यांना सर्व प्रकरणे आमच्यासमोर मांडा कोणत्या त्रुटी आहेत पाहुद्या तर त्यांनी एक प्रकरण दाखवलं नाही की जे त्रुटी अभावी नामंजूर आहे. आणि त्यावेळस हा सगळा काळाबाजार बाहेर आला आणि त्याच्या नंतर तातडीने तीन दिवसात मीटिंग लावली. आणि आणि घाई-घाईत प्रकरणे मंजूर करून घेतली.

 

यात शेवटी नमूद केले आहे की, संजय गांधी योजना असो की आमच्या काळात मंजूर झालेले रस्ते असो की पूल हेच काम करण्यात तुमची संपूर्ण आमदारकी संपून गेली तरी सुद्धा आमच्या काळातील कामे अजून शिल्लकच आहेत , आमच्या काळात आलेल्या कृषि महाविद्यालयात काम करून किती लोक पोट भरत आहेत याची जरा माहिती घ्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा की ३० वर्षात तुम्ही काय केलं……? असे रऊफ खान बाबू खान यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Protected Content