दोन गुलाबरावांच्या भेटीत फुलले हास्याचे ‘गुलाब’ !

53700919 669b 499e a7ea 703f197171a8

धरणगाव (प्रतिनिधी) आज सकाळी पाळधीत अचानक राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर प्रचार करीत असताना राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवास्थानी पोहोचले. अकस्मात झालेल्या या भेटीप्रसंगी दोघांनी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातले एकेकाळचे हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आपली कटुता विसरून काही वेळ हास्यविनोदातही रमले होते. दरम्यान, दोघा गुलाबरावांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे सध्या प्रतिनिधीत्व करतात, सध्या ते राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. याआधी गेल्यावेळी या मतदार संघात गुलाबराव देवकर यांनी त्यांना बाहेरून येऊन आव्हान दिले होते आणि पराभूतही केले होते. त्यावेळी त्यांनाही राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीतही तेच दोघे या मतदार संघात पुन्हा आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी सगळी गुंतागुंतीची स्थिती असताना या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा सन्मान राखून परिपक्वता दाखवत एकमेकांची भेट घेणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे, हे चित्र देशभरात सुरु असलेल्या खुनशी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चांगलेच आशादायक आहे. देवकरांचा स्वभाव मुळातच मवाळ आहे तर गुलाबराव पाटील मुळात आक्रमक असले तरी आता मंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर त्यांनीही आपल्या स्वभावाला चांगलीच मुरड घातली आहे. त्यामुळेच हे दोघे नामबंधू या भेटीत हास्याचे ‘गुलाब’ फुलवताना दिसले. या भेटीप्रसंगी दोन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content