ग. स. सोसायटी निवडणुकीची नांदी ! : प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे सहकारातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत.

कोरोनाच्या आपत्तीमुळे ग.स. सोसायटीच्या निवडणुकीला पुढे ढकलण्यात आले आहे. मध्यंतरी प्रारूप मतदार यादीच्या माध्यमातून थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र राज्य सरकारने निर्बंध लादल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मात्र आता ग.स. ची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली आहे. २१ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीला कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे वर्षभरापासून संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षेनंतर सहकार विभागाने निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रारूप यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, यंदाची पंचवार्षिक निवडणूक ही अनेक अर्थांनी लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. या वेळेस सहकार, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती, स्वराज्य पॅनल आपापले उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. सहकारातील मातब्बर म्हणून ओळखले जाणारे हणमंतराव पवार आणि बी.बी. आबा पाटील हयात नसल्याने या वेळेस किंगमेकरच्या भूमिकेत कोण असणार ? या बाबत देखील उत्सुकता लागली आहे.

जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तात्पुरत्या मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप मागवण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी ७ मार्च रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होईल. साधारणपणे एप्रिल महिन्यात ग.स. सोसायटीची निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content