कपिल देव यांचा बीसीसीआय सल्लागार समितीचा राजीनामा

kapil dev cac 759

नवी दिल्ली वृत्तसंस्था । टीम इंडीयाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) च्या क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचे प्रमुख होते. दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून बीसीसीआयचे लोकपाल डी.के. जैन यांनी त्यांना नोटीस पाठवली होती.

भारतीय पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशिक्षक पदासाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यानुसार या समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड केली होती. या समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश होता. या आधी सल्लागार समितीच्या सदस्य आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामापत्र प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवले.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव हे क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदासह समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी देव यांना दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली होती. या नोटीशीला त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. कपिल यांच्यासह याच मुद्द्यावरून गायकवाड आणि रंगास्वामी यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Protected Content