कोतवालावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘काम बंद’ आंदोलन

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शेलवड येथील कोतवार गजानन अहिरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून तालुका कोतवाल संघटनेने कारवाई होईपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.

 

बोदवड तालुक्यातील शेलवड येथील कोतवाल गजानन अहिरे यांना गौण खनिज माफियांनी मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाभरात अवैध गौणखणीज वाहतुकीविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून या करिता सर्व महसूल कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत अश्यातच दिनांक १२ रोजी  बोदवड शहरात अवैध गौणखनिज विरुद्ध कारवाई करत असताना गजानन सुरेश अहिरे कोतवाल शेलवड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यामध्ये त्यांना बोदवड शहराच्या मध्यवर्ती पटकीच्या भागामध्ये भर रस्त्यात दिवसा-ढवळ्या मारहाण करण्यात आली. व जीवे मारण्याची धमकी दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली.

 

या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण असून या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना निर्माण होत आहे. तरी या प्रकरणातील दोषी यांना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी बोदवड तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी संघटना आरोपीस अटक होईपर्यंत काम बंद ठेवून आपला निषेध नोंदवत आहे. तसेच या प्रकारांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी या बाबत निवेदन तहसीलदार मयूर कळसे यांना दिले आहे.

 

हे आंदोलन आजपासून सुरू होत असल्याचे नमूद करण्यात आले असून याच्या प्रती जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना देण्यात आल्या आहेत.

Protected Content