मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे !

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या उपोषणाची सांगता केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २९ ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तीन दिवसांनी अर्थात १ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर उपस्थित जनसमुदायाचा संताप अनावर झाला होता. यातून पोलिसांनी लाठीमार केल्याने हे आंदोलन सर्वत्र चर्चेत आले. यानंतर, मनोज जरांगे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या दोन मागण्या मान्य केल्या. यात निजाम कालीन कुणबी नोंदी असणार्‍यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा निर्णय झाला. तसेच याचा डाटा मिळावा म्हणून समितीची घोषणा देखील करण्यात आली. तथापि, सर्वांनाच सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जरांगे आग्रही होती. राज्य शासनासोबत अनेकदा चर्चेच्या फैरी झडल्यानंतरही काही तोडगा निघत नव्हता. काल रात्री उशीरापर्यंत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी साडेदहाच्या सुमारास आंतरवाली सराटी गावात गेले. त्यांनी जरांगे यांच्यासोबत सखोल चर्चा केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी ज्युस पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता केली.

Protected Content