त्यांच्या भाषणाची स्क्रीप्ट भाजपने लिहून दिलीय : जयंत पाटील

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवारांचा द्वेष करा अशी स्क्रीप्ट राज ठाकरे यांना भाजपने लिहून दिली असून याचीच प्रचिती औरंगाबादच्या सभेत आल्याची टीका जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील भाषणानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही राज यांना लक्ष्य केले आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील भाषण संपले आणि त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमधील स्टेजवर भाषणासाठी व्यासपीठावर चढले. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून मिलीभगत आहे हे सिद्ध झाले आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणात मला काहीच दम वाटला नाही. भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते. मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे. महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. पण राज साहेबांनी महागाईवर पण बोलावे. पण ते बोलत नसल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसते आहे. भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली. शरद पवार यांच्याविरोधात जितके जास्त बोलता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विष कालवून धर्माधर्मात तेढ निर्माण करुन समाजात विष कसे पसरवता येईल यासाठी जितके जास्त कसे चिथावणीखोर बोलता येईल तसा प्रयत्न राज ठाकरेंच्या भाषणातून दिसत होता, असं जयंत पाटील म्हणाले.

Protected Content