अमळनेर प्रतिनिधी । भाजप सरकारने जाहिरातीवर सर्वात जास्त खर्च केला असून मोदी सरकारने फक्त थापा मारल्याचा आरोप येथे राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या बुथ मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ बूथ मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी माजी आमदार मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे, अनिल भाईदास पाटील उमेश नेमाडे, ज्ञानेश्वर माळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, भाजपाने देशापुढे सर्व बाजूने जनतेला लुटण्याचा एक नवा धडा मांडला. मोदींच्या नाकर्तेपणाच्या मुद्द्यांचा विचार निवडणुकीत मतदान करण्याआधी करावा, आणि गुलाबराव देवकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. ते पुढे म्हणाले की, आपण बूथ कमिटीवर जोर देण्याची गरज आहे. येणार्या लोकसभा निवडणुकीसोबत विधासभेत पक्षाच्या जागा नक्कीच वाढतील, यामध्ये बुथ कमिट्यांचा मोठा सहभाग असेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०१४ साली मोदींनी प्रत्येक भाषणात देशाला केवळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले. हे एकप्रकारचे मृगजळ होते आणि त्यामागे जनता लागली. पाच वर्षांत कोणती कामं केली यावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत, पण पाकिस्तानच्या विषयावर मोदी मत मागतात. त्यांच्याकडे बाकी मुद्देच नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी केली. ते पुढे म्हणाले की, पुलवामा घटनेचा हिशोब देशाला हवाय. याला जबाबदार कोण याचे उत्तर आपण द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. भावनांचे राजकारण करण्याचे काम मोदी करत आहेत, असेही ते म्हणाले. देशाच्या जनतेने यावर विचार करण्याची गरज आहे. जळगाववासियांनो आपली किंमत अजून कमी करुन घेऊ नका. जळगावात गुलाबराव देवकर अप्पांचे गुलाब उमलून आणून गिरीश महाजन यांचे काटे साफ करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.