जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्यावर भाषणबंदी लादल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा चांगलीच गाजत आहे. यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी देखील आपल्या भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र याचसोबत ते वादाच्या भोवर्यात देखील सापडले आहेत. त्यांनी शेलक्या शब्दांचा वापर केल्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांच्यावर भाषणबंदी लादली. याबाबतचे आदेश पोलिसांनी त्यांना देताच तेथे उपस्थित पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर हॉटेल के. पी. प्राईड येथून सुषमा अंधारे आणि त्यांच्या सहकार्यांनी पायी चालत जात शहर पोलीस स्थानक गाठले. येथे पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सर्व पदाधिकारी चोपडा येथे रवाना झाले. तेथे आज महाप्रबोधन यात्रा होत आहे. यात सुषमा अंधारे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.