बिग ब्रेकींग : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली गावाजवळील धारागिर शिवारातील पाण्याच्या डोहात दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारात असलेल्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी जयेश जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि श्रवण शिवाजी पाटील (वय-१५) तिघे रा. राजपाल नगर, शिरसोली जळगाव हे गुरूवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी गेले होते. यात पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि श्रवण पाटील यांना पाण्याचा अंदाज न असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जयेश सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे. दोघेजण पाण्यात बुडत असल्याचे पाहून जयेशने शिरसोली गावात धाव घेतली. त्यामुळे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरीकांना तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघांचे मृतदेह रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मयत निलेशच्या पश्चात वडील राजेंद्र एकनाथ मिस्तरी, आई यशोदा, बहिण आरती असा परिवार आहे.

श्रवणच्या पश्चात वडील शिवाजी रामकृष्ण पाटील आणि लहान भाऊ चेतन परिवार आहे. श्रवणची आई दोन वर्षांपुर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. अशी माहिती मिळाली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content