अजितदादांच्या आश्‍वासनानंतर सुटले रवींद्र नाना पाटील यांचे उपोषण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कापसाला बारा हजार रूपयांचा भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण हे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर सुटले.

या संदर्भातील वृत्त असे की, कापसाला बारा हजार रूपयांचा किमान भाव मिळावा, तसेच शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिनांक १४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी भेटी देऊन पाठींना दर्शविला होता. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी जागरण आणि गोंधळाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला होता.

दरम्यान, काल अमळनेरात राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम झाला. यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास अजित पवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात कपाशीच्या प्रश्‍नावर मुद्दा उपस्थित करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर रवींद्र नाना पाटील यांना त्यांनी लिंबू सरबत देऊन त्यांच्या उपोषणाची सांगता केली.

Protected Content