कैदी पळाल्याने तुरूंग अधिक्षकांसह चौघे निलंबीत

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा कारागृहातून तीन कैदी फरार झाल्याची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेऊन तत्कालीन अधिक्षक व तुरूंगाधिकार्‍यांसह चौघांना निलंबीत करण्यात आले आहे.

जळगावच्या तुरूंगातून तीन कैदी फरार झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. अगदी दिवसाढवळ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लाऊन सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) यांनी पलायन केले होते. या सिनेस्टाईल घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अगदी कसून शोध घेण्यात येत असला तरी अद्याप फरार झालेले तिन्ही कैदी आढळून आलेले नाहीत.

दरम्यान, तुरूंगातून कैदी पळाल्याचे प्रकरण हे संवेदनशील असल्याने याची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तुरूंगाचे तेव्हा असणारे अधिक्षक राजेंद्र मरळे, तुरूंग अधिकारी बी.एम. तडवी, रक्षक संजय पाटील आणि प्रकाश मालचे या चौघांना निलंबीत करण्यात आले आहे. तर मरळे यांच्या जागी उस्मानाबाद येथील गजानन पाटील यांना अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असले तरी आता त्यांच्या जागी पेट्रेस जोसेफ गायकवाड यांची कारागृह अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे फरार झालेल्या तिन्ही गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

Protected Content