लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे पो. नि. धनवडेंवर कारवाई करा : भगवान सोनार करणार गृहमंत्र्यांकडे मागणी

जळगाव प्रतिनिधी । सोशल मीडियातून चमकोगिरी करत लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्यावर कार्यवाहीसाठी आपण गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाधयक्ष भगवान सोनार यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल पोलीस स्थानकाचे निरीक्षक अरूण धनवडे हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. त्यांनी डांभुर्णी येथील प्रकरणात वार्तांकन करणार्‍या पत्रकाराला आरोपी केल्याने मीडीयाने याची गंभीर दखल घेतली आहे. या पाठोपाठ त्यांची सोशल मीडियातील चमकोगिरी अंगलट आली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून २५ एप्रिलरोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बदली झाल्याचा आव आणत अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात यावल शहराचा तथाकथित विकास केल्याच्या गप्पा करीत यावल पोलीस स्टेशनला बेकायदेशीर २०० जणांचा जमाव जमा करणार्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची तक्रार पत्रकार भगवान सोनार राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पो.नि. धनवडे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या मयताच्या कुटूंबियांशी उद्धट वर्तणूक, पत्रकार मनोज नेवे यांच्यावर आकसाने कारवाई, स्थानिक राजकारण्यांच्या हातचे प्यादे बनून विशिष्ट लोकांच्या हितासाठी एकतर्फी कारवायांची मनमानी आदी गंभीर आरोप धनवडे यांच्यावर बर्याच दिवसांपासून होत आहेत.
२५ एप्रिल रोजी सायंकाळी अरूण धनवडे यांची बदली एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी पोलीस ठाण्यासमोर केली होती. यावेळी उपस्थित जमावाने अरुण धनवडे यांच्या समर्थनार्थ भाषणे ठोकून त्यांच्या कथित बदलीला विरोध केला होता. यावेळी जमावाला संबोधन करताना धनवडे यांनी आपले प्रमोशन एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याची मखलाशी केली होती. मात्र ही बाब त्यांच्या अंगलट आली असून जमावबंदीचा आदेश धुडकावत गर्दी जमविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धनवडे यांच्यावर काहीही कारवाई केलेली नसल्याने राज्याच्या गृहमंत्र्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी करणार असल्याचे ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी सांगितले.

Protected Content