मित्राच्या आईच्या दहाव्यासाठी जातांना गमावला जीव; गोसावींच्या निधनाने परिसरात हळहळ

पाचोरा नंदू शेलकर । आपल्या मित्राच्या आईच्या दहाव्यासाठी जातांना पोलीस दलाचे विधी अधिकारी दुर्गादास मधुगिरी गोसावी यांचे आज सकाळी अकाली निधन झाले. ऐन तारूण्यात उमद्या स्वभावाच्या गोसावी यांच्या निधनाने पाचोर्‍यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथील कृष्णराव हौसिंग सोसायटीतील रहीवाशी व जळगांव पोलिस अधीक्षक कार्यालयाचे विधी अधिकारी दुर्गादास मधुगिरी गिरी (गोसावी) (वय -३५) यांच्या पारोळा येथील मित्राच्या आईचे नाशिक येथे निधन झाले होते. त्यांचे दशक्रियेचा कार्यक्रम पारोळा येथे होणार असल्याने दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात वेळेत पोहचावे यासाठी दुर्गादास गोसावी यांचे मित्र संदिप पाटील हे दोघं जण मोटरसायकलवरुन पारोळा येथे जाण्यासाठी निघाले होते. दि. २० रोजी सकाळी ८ वाजता जळगांव येथुन पारोळ्याला जाण्यासाठी दुर्गादास गोसावी हे मागील सीटवर बसुन होते. सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुर्गादास गोसावी हे जागीच ठार झाले. तर संदिप पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी संदिप पाटील यांचेवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

दुर्गादास मधुगिरी गोसावी हे शनिवारी – रविवारी पाचोरा येथे घरी आल्यानंतर दर सोमवारी जळगांव येथे जावुन सोमवार ते शुक्रवार आपल्या बहिणीकडे राहत असत. ते जळगांव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात विधी अधिकारी म्हणुन काम पहात होते. नित्याप्रमाणे ते सोमवारी जळगाव येथे गेल्यानंतर बुधवारी सकाळी मित्रासोबत पारोळा येथे मोटरसायकलवर निघाल्यानंतर बांभोरी गावाजवळ मागुन अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोसावी हे जागेवर ठार झाले. तर त्यांचे मित्र संदिप भिकन पाटील हे गंभीर जखमी झाले.

आज दुपारी चारच्या सुमारास दुर्गादास गोसावी यांचा सायंकाळी ४ वाजता पाचोरा शहरातील त्यांचे शेतात दफन विधी करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात दोन भाऊ, आई, एक बहिण असा परिवार असुन ते युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी (गोसावी) व अ‍ॅड. कालिदास गिरी (गोसावी) यांचे बंधु होत. मयत दुर्गादास गोसावी यांच्या अंत्यविधीस जळगाव येथील ए. एस. पी. कुमार चिंथा, ए. एस. आय. सुनिल पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती. दरम्यान, गोसावी यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content