ख्वाजामियाँ जवळील अतिक्रमित हॉटेल हटविण्याचे महापौरांचे निर्देश (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छतेसाठी महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून बुधवारी प्रभाग ७, ८, ९ मध्ये दौरा करण्यात आला. पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीलाच ख्वाजामियाँ चौकात मनपाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या अतिक्रमित हॉटेलमध्ये महापौरांनी धडक दिली.

हॉटेल मालकाला जाब विचारत महापौरांनी तात्काळ हॉटेल हटविण्याचे अतिक्रमण विभागाला आदेश केले. दरम्यान, हॉटेल मालकाने ८ दिवसांची मुदत मागितली असून स्वतः सर्व साहित्य आणि हॉटेल काढून घेणार असल्याचे त्याने मान्य केले. महास्वच्छता अभियानाच्या सुरुवात प्रसंगी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा.सचिन पाटील, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, चंद्रशेखर पाटील, मयूर कापसे, राम पाटील, मनोज काळे, भरत सपकाळे, गजानन देशमुख, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर, शक्ती महाजन, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस. एस. पाटील, बाबा साळुंखे, उदय पाटील आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

हॉटेलचे अतिक्रमण तात्काळ हटवा
ख्वाजामियाँ दर्ग्याच्या मागील बाजूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेत एकाने शेड उभारत हॉटेल सुरू केले आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दौऱ्याच्या सुरुवातीलाच हॉटेलमध्ये धडक दिली. मनपाच्या जागेत कुणाच्या परवानगीने हॉटेल सुरू केले याचा जाब विचारत जागा तात्काळ खाली करून देण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. हॉटेल मालकाने ८ दिवसांची मुदत मागितली असून जर ८ दिवसात त्याने खाली न केल्यास अतिक्रमण विभागाने कारवाई करावी असे निर्देश महापौरांनी दिले.

खुल्या भूखंड धारकांना नोटीस
भगीरथ कॉलनी परिसरात गटारींची स्वच्छता आणि रस्त्यांची झाडझूड नियमीत होत नाही. गटारीतून काढलेली घाण ५ दिवस उचलण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच सूचना देत पुन्हा नागरिकांची तक्रार येता कामा नये असे सांगितले. पाहणी दरम्यान काही खाजगी भूखंडावर घाण आढळून आली. महापौरांनी सूचना देत अशा भूखंडावर घाण असल्यास संबंधीत जागा मालकाला नोटीस द्यावी. त्याने योग्य उत्तर न दिल्यास सफाई करून आपण मालकाकडून खर्च वसूल करावा, असे महापौरांनी सांगितले.

शिवकॉलनी नाल्याची जेसीबीने सफाई करा
शिवकॉलनीतील नाल्याची साफसफाई झाली असून घाण साचल्याने डास, मच्छरांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौरांनी लागलीच नालेसफाईकामी जेसीबी उपलब्ध करून घ्यावे असे सांगितले.

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवा
बजरंग बोगदा ते शिवकॉलनी रेल्वेपूल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्सची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. पिंप्राळा चौकात देखील रस्त्याच्या मधोमध विक्रेत्यांनी गर्दी केली असून ते हटविण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. महापौरांनी अतिक्रमण विभागाला सूचना देत अतिक्रमण हटविण्याचे सांगितले.

गटारीच्या कामावरून अधिकाऱ्यांना खडसावले
बजरंग बोगदा ते एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे काम ३ वर्षापासून सुरू आहे. गटारीचे काम संथगतीने सुरू असून कामाचा दर्जा योग्य नसल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. मुख्य गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून मनपा अधिकारी गुणवत्ता तपासत नाही. गटारीचे काम इतके निकृष्ट असून एक लाथ मारली तरी भिंत पडेल. नाल्याचा आकार एका रेषेत नसून नागमोडी झाला आहे. आजच तुम्ही लक्ष देत नाही तर पुढे कशी दुरुस्ती होणार अशा शब्दात महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अमृतच्या नावाने नागरिकांची ओरड
शंकर आप्पा नगरात अमृतच्या चाऱ्या बुजविल्या जात नाही. नळ जोडणी नंतर गळती तपासली जात नाही. तुलसी नगरात देखील तीच परिस्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी व नगरसेवकांनी केली. अमृतच्या मक्तेदाराकडे १८० मी.मी.चे सॅडल उपलब्ध नसून डांबरीकरण होत नसल्याची तक्रार स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी मांडली. महापौरांनी मक्तेदार प्रतिनिधीला बोलावून तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या. पिंप्राळा परिसरात २५० एलईडी बसविण्याचे राहिले असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे महापौरांनी सांगितले.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, दंड
बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३८१ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३४३ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५५ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ५७ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

दिवसभरात उचलला २९४ टन कचरा
सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून २९४ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. मोहीम असलेल्या सहा प्रभागातून तब्बल २४ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1122590584860031

Protected Content