Home Cities जळगाव जळगावात प्रथमच ‘श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सव’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात प्रथमच ‘श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सव’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावात प्रथमच श्री श्री ऍग्री ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग जळगाव आणि केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. रविवार, ९ ऑगस्ट रोजी शिक्षकवाडी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात झालेल्या या महोत्सवाला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी सानिका धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष नितीन झवर, डॉ. गिरीश बोरसे आणि डॉ. रंजना बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि आहारातील बदलांमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक पाककृती याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला.

महोत्सवात सकाळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व त्यापासून तयार होणाऱ्या विविध पाककृती तसेच मधमाशी पालन या विषयांवर उपस्थितांना माहिती देण्यात आली. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून संकलित करण्यात आलेल्या ताज्या रानभाज्या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासोबतच नैसर्गिक पद्धतीने उत्पादित धान्य, डाळी, कडधान्ये, कोल्ड-प्रेस तेल, नैसर्गिक गूळ, मसाले, फळभाज्या आणि अन्य शेतमालही ग्राहकांसाठी उपलब्ध होता.

‘शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांपर्यंत’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामुळे ग्राहकांना उत्पादकांकडून थेट ताजा, विश्वासार्ह आणि नैसर्गिक शेतमाल खरेदी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विविध रानभाज्या आणि नैसर्गिक शेतमाल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि नैसर्गिक शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक शेतकरी व उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.


Protected Content

Play sound