Home क्राईम सातपुडा पायथ्याशी मनुदेवी मंदिरात चोरी ; दीड लाखांचे चांदीचे दागिने लंपास

सातपुडा पायथ्याशी मनुदेवी मंदिरात चोरी ; दीड लाखांचे चांदीचे दागिने लंपास

0
16

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या प्रसिद्ध श्री मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मंदिराचे प्रवेशद्वार आणि गाभाऱ्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मनुदेवी व रेणुका देवीच्या मूर्तीवरील मुकुट आणि चांदीच्या छत्र्या असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ आणि ७ तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असावी. मंदिरातील प्रमुख प्रवेशद्वार तसेच गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप, कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मनुदेवी आणि बाजूला असलेल्या रेणुका देवीच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या चोरून नेण्यात आल्या.

या घटनेची फिर्याद मनुदेवी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर शिवाजी पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मंदिरातील प्रमुख प्रवेशद्वार आणि गाभाऱ्याचे दरवाजे दररोज सायंकाळी साडेपाच वाजता कुलूप लावून बंद केले जातात. रात्रीच्या वेळी मंदिराच्या सुरक्षेसाठी सखाराम बारेला हे पहारेकरी म्हणून कार्यरत असतात.

घटनेच्या रात्री पहारेकरी सखाराम बारेला मंदिराच्या वरच्या बाजूस झोपले होते. मंदिराच्या परिसरात असलेल्या धबधब्याचा मोठा आवाज असल्याने चोरट्यांना चोरी करताना त्याचा फायदा झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दागिने घेऊन पसार झाले.

चोरीस गेलेल्या ऐवजात मनुदेवी आणि रेणुका देवीच्या मूर्तीवरील दोन चांदीचे मुकुट तसेच दोन चांदीच्या छत्र्यांचा समावेश आहे. एका मुकुटाची अंदाजे किंमत ४० हजार ५०० रुपये असून त्याचे वजन सुमारे ३०० ग्रॅम आहे. तर एका चांदीच्या छत्रीची किंमत अंदाजे २७ हजार रुपये असून तिचे वजन सुमारे २०० ग्रॅम असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एकूण चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रभाकर शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत. सातपुडा पर्वताच्या परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या मनुदेवी मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound