कृषी खात्याच्या विविध योजनांचा शेतकर्‍यांना लाभ ( व्हिडीओ )

वर्धा । राज्याच्या कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा शेतकर्‍यांना लाभ होत आहे. विशेष करून नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना म्हणजेच पोकराच्या माध्यमातून बळीराजाला मोठ्या प्रमाणात लाभ होतांना दिसून येत आहे.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना अर्थात पोकराचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. पोकराचे प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे हे सध्या राज्य दौर्‍यावर असून ते योजनांच्या लाभार्थी शेतकर्‍यांना भेट देऊन त्यांच्या कडून माहिती जाणून घेत आहेत. या अनुषंगाने त्यांनी नुकताच परभणी जिल्ह्यात दौरा केला. यात मौजे जुनोना येथील ममता कृष्णा पहाडे यांच्या शेतातील काकडी पीकाची पाहणी त्यांनी केली. ममता पहाडे यांनी पोकरा योजनेच्या मदतीने आपल्या १.५० हेक्टर क्षेत्रफळाच्या शेतात ठिबक सिंचनाचा संच बसविला आहे. याच्या मदतीने त्यांनी आधी कलींगडाचे पीक घेतले असून सध्या काकडीची लागवड केली आहे. तर सप्टेंबर महिन्यात त्या पुन्हा कलिंगडाचे पीक घेणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

यासोबत मौजे चारमंडळ येथे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नत्थू अजाबराव येंडे यांच्या शेताजवळ कंपोझिट गॅबियन बंधारा बांधण्यात आला असून यातील पाणी साठ्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली. या बंधार्‍यामुळे आधी पूर्णपणे कोरडवाहू असणार्‍या त्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. तर, जुनोना येथील नरेंद्र रामराव पहाडे यांनी पोर्टेबल मिनी डाळ मील सुरू केली आहे. यात त्यांनी विजेवर चालणार्‍या डाळ मिलला ट्रॅक्टरसोबत जोडले आहे. याच्या मदतीने त्यांनी शेतकर्‍यांना बांधावर आणि घरी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी त्यांनी गटामधून ट्रॅक्टरचे अनुदान घेतले आहे.

यानंतर भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी मौजे तुळजापूर (ता. सेलू) येथील पोकरा योजनेच्या अंतर्गत असणार्‍या शेती शाळेला भेट दिली. या योजनेतून १० एकरवर सोयाबीनची लागवड करणार्‍या श्री. ढोले या शेतकर्‍याने त्यांना याप्रसंगी योजनेमुळे त्यांना झालेल्या लाभाची माहिती दिली. याप्रसंगी भाऊसाहेब बर्‍हाटे यांच्या सोबत कृषी पर्यवेक्षक आर. टी. राऊत यांच्यासह कृषी खात्याचे अन्य सहकारी उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा कृषी योजनांची माहिती.

Protected Content