भुसावळ ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन यंत्रणेचे लोकार्पण

भुसावळ प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या माध्यमातून येथील ग्रामीण रूग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन यंत्रणेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार दीपक धिवरे, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष संदीप जोशी, सुधाकर सनांसे, डॉ. देवर्षी घोषाल आदी उपस्थित होते. ग्रामीण रूग्णालयात लावण्यात आलेल्या मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीच्या कामासाठी आमदार संजय सावकारे यांच्या आई सुशीला वामन सावकारे यांनी एक लाख रूपयांची मदत रोटरीला दिली आहे. ते म्हणाले की, रोटरीने घेतलेल्या पुढाकारामुळे आता अनेक रूग्णांचे प्राण वाचतील. रूग्णालयास रोटरीच्या माध्यमातून टेबल, खुर्च्या पुरवल्या जातील. रूग्णालयास संरक्षण भिंतीची व ग्रीलची गरज आहे. यासाठी प्रस्ताव पाठवा, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मी भेटून त्यास मंजूरी मिळवून आणेल. तर जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामीण रूग्णालयात ४० बेडसाठी मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे, तालुक्यासह ग्रामीण भागातील आणि शेजारच्या जिल्ह्यातील रूग्णांचे प्राण वाचतील.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष सुधाकर सनंसे, सचिव संजय भटकर, रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा तसेच दोन्ही रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content