नूतन मराठाच्या हजार कोटींच्या जमीनीवर गिरीश महाजनांचा डोळा- अ‍ॅड. विजय पाटील (Video)

जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन यांचे मित्र खटोड आणि झंवर यांना जमीनीतील व्यवहार चांगलेच समजतात. यामुळे नूतन मराठाच्या एक हजार कोटींच्या जमीनीवर गिरीश महाजन यांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. महाजन यांनी जामनेर येथील जैन समाजाची शिक्षण संस्था हडप केली. जामनेर येथील उर्दू शाळेच्या जागेवर कॉम्लेक्स बांधले. यानंतर पहूर येथील लेले विद्यालयात प्रवेश केला. आणि चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन विकत घेतली. आणि याच प्रमाणे नूतन मराठा हडप करण्याचा महाजनांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. विजय पाटील यांनी गिरीश महाजनांवर जोरदार पलटवार केला.

गंभीर आरोपांची सरबत्ती

* विरोधकांवर कलम-३०७ लावणे हा गिरीश महाजनांचा पॅटर्न

* भोईटे गटाला महाजनांचे पाठबळ; पोलीस यंत्रणेचा गैरवापर

* निंभोराच नव्हे तर कुठेही व केव्हाही गुन्हा दाखल करता येतो.

*…तर महाजनांच्या सीडीआरमध्ये जुही, मोना, डॉलीचे संदर्भ आढळतील !

* महाजनांच्या विरूध्दचे पुरावे सीडी व पेन ड्राईव्हमध्ये जमा केलेत.

* लवकरच जामनेर नगरपालिकेतील घोटाळ्याबाबत गुन्हे दाखल करणार !

कालच माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्यावर आरोपांची सरबत्ती करून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला होता. याला आज अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, २०१६ साली झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवारी केली होती. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महाजन यांनी खूप प्रयत्न केले. मात्र आपण ठाम राहिल्याने निवडणूक होऊन यात मला १०३ मते मिळाली. यातील १३ मते बाद ठरून ९० मते मिळाली. अर्थात, या निवडणुकीत गिरीश महाजन यांना २० कोटी रूपये लागले. तेव्हापासून गिरीश महाजन यांनी डूख धरला. यानंतर मविप्रच्या अजित पवार यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री असूनही महाजन यांना बोलावले नाही याबद्दल ते संतप्त झाले. यानंतर शिक्षण विभागाने पत्र काढून कार्यकारिणी रद्द केली.

खरं तर, मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक ही सहकार कायद्यानुसार झालेली असली तरी कार्यकारिणी रद्द केली. यानंतर पोलिसांना दबावाखाली मॅनेज करण्यात आले. यातून आमच्या ताब्यातून हे ऑफीस भोईटे गटाच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर ३१८ दिवसांपर्यंत या संस्थेत पोलिस बंदोबस्त तो देखील न मागता बंदोबस्त देण्यात आला. यात दंगा नियंत्रण पथकाचाही समावेश होता. हा सर्व कार्यक्रम गिरीश महाजनांनी लावल्याचा आरोप पाटील यांनी केला.

दरम्यान, गिरीश महाजन यांचे मित्र सुनील झंवर व खटोड यांना जमीनीचे भाव चांगलेच कळतात. त्यांनी जामनेर येथील जैन समाजाच्या विद्यालयात आपल्या नातेवाईकांना आत केले. तेथील १२ कोटींची प्रॉपर्टी यांच्या मामाने १२ लाखांमध्ये घेतली. चाळीसगावातील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन ही सुरेश जैन यांना वाचवण्यासाठी कवडीमोल भावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विकत घेतली. पहूर येथील लेले विद्यालयात तर स्वत: गिरीश महाजन अध्यक्ष झाले आहेत. जामनेर येथील उर्दू शाळेची जमीन विकून तेथे खासगी संकुल उभारण्यात आले आहे. आणि याच्या जोडीला मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जमीनीवरही आमदार महाजन यांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी याप्रसंगी केला.

अ‍ॅड. पाटील म्हणाले की, फौजदारी गुन्हा हा कधीही आणि कुठेही दाखल करता येतो. २०१९च्या अखेर पर्यंत गिरीश महाजन हे राज्याचे महत्वाचे मंत्री होते. यामुळे पोलीस कार्यवाही करत नव्हते. आणि गुन्हे देखील दाखल करत नव्हते. जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांच्या विरोधकांवर कलम-३०७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आपल्या विरोधकांवर व अगदी महिलांवरही कलम-३०७चे गुन्हे दाखल करण्याचा गिरीश महाजन यांचा पॅटर्न असल्याचे पाटील म्हणाले. राजकीय नेते पोलिसांचा वापर करून विरोधकांना कसा त्रास दिला जातो यावर एक पुस्तक होऊ शकेल असेही ते म्हणाले. आमच्यावर २० वर्षांआधी न केलेल्या अपहाराचा गुन्हा दाखल होतो तर हा गुन्हा का दाखल होत नाही ? असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

अ‍ॅड. विजय पाटील म्हणाले की, मध्यंतरी मी कोरोना पॉझिटीव्ह होतो. क्वॉरंटाईन असतांना आपण निंभोरा येथे वास्तव्यास होतो. यामुळे आपण नियमाला अनुसरूनच निंभोरा येथे फिर्याद दिली आहे. अशा प्रकारचा गुन्हा हा कुठे देखील नोंदता येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. नूतन मराठा येथील वादात आपण तेथे उपस्थित नसतांनाही आपल्यावल कलम-३०७ लावण्यात आले. यानंतर घरकूल घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा झाल्यावर आपल्याला अटक करण्यात आली. सुरेश जैन आरोपी असतांना त्यांना दोन वर्षे हॉस्पीटलमध्ये ठेवण्याची सुपारी सुध्दा गिरीश महाजन यांनीच घेतली होती असा आरोप त्यांनी केला. घरकूलमधील १० आरोपींना धुळ्यातील मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमीट करून घेतले. गिरीश महाजनांचे राजकारण ३०७ कलमांवर अवलंबून आहे. जामनेर तालुक्यात त्यांनी याच प्रकारे अनेकांवर अत्याचार केले असल्याचा आरोप देखील विजय पाटील यांनी केला आहे.

गिरीश महाजन हे खोटे गुन्हे दाखल करण्याचे सूत्रधार आहेत. महाजन हे पालकमंत्री असतांना आमच्या सॉ-मीलवर भेटण्यासाठी आलो होतो. तेव्हा त्यांनी घरकूल प्रकरणी माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र आम्ही याला मान्य केले नाही. जर गिरीश महाजन यांना वाटत असेल की, गुन्हा खोटा आहे तर मग ते उच्च न्यायालयात का गेलेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षी अमळनेर तालुक्यातील मारवड येथे आपल्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आपण जामीन न घेता दुसरीकडे उपस्थित असल्याचे पुरावे दिल्यानंतर हा गुन्हा रद्दबातल ठरला. गिरीश महाजन हे सीडीआर काढण्याची मागणी करत असतांना आमच्या दोघांचे सीडीआर काढून दाखवा असे विजय पाटील यांनी आव्हान केले. मात्र त्यांच्या सीडीआरमध्ये जुही, स्वीटी, डॉली मोना यांचे विवरण सुध्दा समोर येऊ शकते असा खोचक टोला विजय पाटील यांनी दिला.

आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत असल्याची माहिती विजय पाटील यांनी याप्रसंगी दिली. आपण तीन लाखांची भोईटे यांना दिली. तर एक लाख पोलीस निरिक्षक गायकवाड यांना दिल्याचेही विजय पाटील म्हणाले. दरम्यान आपल्या भाऊंच्या मृत्यूला त्यांचा झालेला छळ कारणीभूत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर जामनेर नगरपालिकेतील भ्रष्टाचारांची प्रकरणे काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. तर, वॉटरग्रेस कंपनीशी आपला संबंध नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले असले तरी नाशिक, धुळे व जळगाव येथील त्यांच्या समर्थकांनी या कंपनीला आणले असे पाटील म्हणाले. तर गिरीश महाजन यांनी अलीकडेच औरंगाबाद येथील अँबेसेडर हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी कुणाला भेटले व यात काय चर्चा झाली ही विचारणा करा असेही ते म्हणाले. त्यांनी कचर्‍यात पैसा खाणे सोडले नाही तर मोठी संस्था कशी सोडणार ? अशी विचारणा देखील त्यांनी केली.

खालील व्हिडीओत पहा अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांची अनकट पत्रकार परिषद !

https://www.facebook.com/508992935887325/videos/144235277472838

Protected Content